‘पासवर्ड’ही वाचवू शकला नाही ‘लॉकर’मधील लाखो रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2022 19:58 IST2022-12-14T19:57:33+5:302022-12-14T19:58:10+5:30
Nagpur News घरातील सर्व सदस्य बाहेरगावी गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. आश्चर्याची बाब म्हणजे लोखंडी अलमारीच्या ‘लॉकर’चा ‘पासवर्ड’ असतानादेखील ते उघडून चोरी करण्यात आली.

‘पासवर्ड’ही वाचवू शकला नाही ‘लॉकर’मधील लाखो रुपये
नागपूर : घरातील सर्व सदस्य बाहेरगावी गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. आश्चर्याची बाब म्हणजे लोखंडी अलमारीच्या ‘लॉकर’चा ‘पासवर्ड’ असतानादेखील ते उघडून चोरी करण्यात आली. बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
भोजराज रामाजी बोकडे (३९, सिंगापूर सिटी, पांजरी, बेसा मार्ग) हे १० डिसेंबर रोजी घराला कुलूप लावून कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले. यानंतर अज्ञात चोरट्यांनी घराचे मुख्य दार डुप्लिकेट चावीने उघडले व घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील लोखंडी अलमारीचे लॉकर उघडण्यासाठी पासवर्ड टाकला. विशेष म्हणजे चोरांनी टाकलेल्या पासवर्डमुळे लॉकरदेखील उघडले. त्यात ५० हजार रोख व सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल होता. तो घेऊन चोरांनी पोबारा केला. घरी परत आल्यावर बोकडे यांना हा प्रकार लक्षात आला. बेलतरोडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चोरांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला व त्यांच्याकडे पासवर्डदेखील होता. त्यामुळे हे काम परिचयातीलच कुणीतरी केले असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.