एकनाथ निमगडे हत्याकांडामध्ये विशेष तपास पथक स्थापन करा; मुलाची हायकोर्टाला मागणी
By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: April 26, 2023 19:05 IST2023-04-26T19:04:36+5:302023-04-26T19:05:43+5:30
राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या आणि संपूर्ण राज्याला हादरविणाऱ्या बहुचर्चित आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्याकांडाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष पथक स्थापन करा, अशी मागणी मुलगा अनुपम निमगडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला केली आहे.

एकनाथ निमगडे हत्याकांडामध्ये विशेष तपास पथक स्थापन करा; मुलाची हायकोर्टाला मागणी
राकेश घानोडे
नागपूर : राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या आणि संपूर्ण राज्याला हादरविणाऱ्या बहुचर्चित आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्याकांडाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष पथक स्थापन करा, अशी मागणी मुलगा अनुपम निमगडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला केली आहे. तसेच, केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) पथकाने या हत्याकांडाचा तपास योग्य पद्धतीने केला नाही, असा आरोपही केला आहे.
या प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय विनय जोशी व भारत देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, सीबीआयने न्यायालयाच्या निर्देशानुसार, हत्याकांडाच्या तपासाचा सर्वसमावेशक अहवाल सादर केला व सक्षम न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याकरिता आवश्यक पुरावे आढळून आले नाही, अशी माहिती दिली. तसेच, प्रकरणाची फाईल बंद करण्याची परवानगी मागितली. त्यावर अनुपम निमगडे यांनी आक्षेप घेतला. पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन हत्याकांडाचा पर्दाफाश झाल्याचे सांगितले होते आणि गुन्हेगारांची नावेही जाहीर केली होती. परिणामी, सीबीआयने योग्य पद्धतीने तपास केला नाही, हे दिसून येते. करिता, तपासाकरिता विशेष पथक स्थापन करणे आवश्यक आहे, असे निमगडे यांनी सांगितले. त्यानंतर न्यायालयाने दोन्ही पक्षकारांचे म्हणणे रेकॉर्डवर घेऊन या प्रकरणावर उन्हाळी सुट्यांनंतर (येत्या जूनमध्ये) पुढील सुनावणी निर्धारित केली.
२०१६ मध्ये घडली होती घटना
ही घटना ६ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी ८ च्या सुमारास सेंट्रल एव्हेन्यूवरील लाल इमली चौकात घडली होती. मॉर्निंग वॉक करून घरी परतत असताना निमगडे यांची बंदूकीच्या ५ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वर्धा मार्गावरील साडेपाच एकर जमिनीच्या वादातून निमगडे यांची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे.