ट्रामा युनिट व महाविद्यालयाच्या सुसज्ज इमारती ठरल्या प्रभावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:10 IST2021-04-30T04:10:19+5:302021-04-30T04:10:19+5:30
भिवापूर : कोरोना संक्रमणाच्या काळात असुविधांअभावी रुग्णांचा जीव टांगणीला आहे. अशात भिवापूरकरांना मात्र सुसज्ज व प्रशस्त इमारतीतून मिळणारी आरोग्य ...

ट्रामा युनिट व महाविद्यालयाच्या सुसज्ज इमारती ठरल्या प्रभावी
भिवापूर : कोरोना संक्रमणाच्या काळात असुविधांअभावी रुग्णांचा जीव टांगणीला आहे. अशात भिवापूरकरांना मात्र सुसज्ज व प्रशस्त इमारतीतून मिळणारी आरोग्य सेवा वरदान ठरत आहे. यात नवनिर्मित ट्रामा केअर युनिटची वास्तू, महाविद्यालयाची सुसज्ज इमारत आणि बॉइज हायस्कूल शाळा अशा सर्व सुविधांनी परिपूर्ण इमारती कोविड संक्रमण काळात रुग्णांसाठी आधारवड ठरत आहेत. गतवर्षी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीत कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले होते. हे सेंटर शहराबाहेर ३ कि.मी. अंतरावर असल्यामुळे रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना दररोज पायपीट करावी लागत होती. आता फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा उद्रेक होताच तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण राऊत यांनी हे कोविड सेंटर ग्रामीण रुग्णालयाच्या नवनिर्मित ट्रामा केअर युनिटच्या वास्तूत सुरू केले. येथे ४० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येकी २० बेडवर ऑक्सिजन, डॉक्टर, कर्मचाऱ्यांना विश्रांतीसाठी स्वतंत्र खोली, औषधसाठा, ऑक्सिजन सिलिंडर, रुग्णांसाठी स्वच्छतागृहाचीसुद्धा उत्तम व्यवस्था येथे आहे. लसीकरणाची मोहीम स्थानिक महाविद्यालयात सुरू केली आहे. माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी यासाठी आपल्या कॉलेजची भव्य सुसज्ज वास्तू देऊ केली. हा परिसर नयनरम्य आहे. याबरोबरच बॉइज हायस्कूलच्या इमारतीत कोविड तपासणीची मोहीम सुरू आहे. राष्ट्रीय मार्गाला लागून असल्याने रुग्ण कोविड तपासणीसाठी सहजरीत्या पोहोचत आहेत. या तिन्ही इमारतींनी शहर व तालुक्यातील आरोग्य सुविधेला बळकटी दिली आहे.
ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू
जवराबोडी येथील पॉझिटिव्ह रुग्णाची ऑक्सिजन लेवल ६० पर्यंत घसरल्याने त्याला रविवारी कोविड सेंटरमध्ये आणण्यात आले. मात्र ऑक्सिजनयुक्त बेड नसल्याचे सांगत त्याला परत पाठविले. रात्री १२ वाजेच्या सुमारास ऑक्सिजनअभावी या रुग्णाचा घरीच तडफडून मृत्यू झाला. कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनयुक्त २० बेड असून, ते फुल आहे. यातील प्रत्येकाला ऑक्सिजन लागलेलाच आहे, असे नाही. त्यामुळे यातीलच एखादा बेड सदर रुग्णाला मिळाला असता तर त्याचे प्राण वाचले असते, असे मत भिवापूरचे माजी सरपंच विवेक ठाकरे यांनी व्यक्त केले.
सर्व रुग्ण आपलेच, पण...
रुग्ण कुठलाही असो शेवटी तो माणूस आहे. त्याला उपचार मिळणे आवश्यक आहे. मात्र, भिवापूरला चांगल्या सुविधा असल्याचे सांगत काही लोकप्रतिनिधींनी राजकीय वरदहस्तातून तालुका व जिल्ह्याबाहेरील रुग्णांना स्थानिक कोविड सेंटरमध्ये दाखल केले आहे. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांना तालुकास्थळीच बेड उपलब्ध होत नाही. जवराबोडी येथील रुग्णाच्या बाबतीतही असाच प्रकार झाला. तालुक्यातील असो की तालुक्याबाहेरील प्रत्येकाला आरोग्य सुविधा मिळायलाच पाहिजे. मात्र हे करताना स्थानिक रुग्णांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही, असे मत शिवसेना तालुका प्रमुख संदीप निंबार्ते यांनी व्यक्त केले.