कोट्यवधीच्या रेशन घोटाळ्यात उद्योजकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 23:00 IST2021-06-25T22:59:30+5:302021-06-25T23:00:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रवर्तन संचालनालय (ईडी)च्या नागपूर विभागाने नांदेड येथील बहुचर्चित कोट्यवधी रुपयांच्या रेशन घोटाळा प्रकरणाच्या कारवाईत ...

कोट्यवधीच्या रेशन घोटाळ्यात उद्योजकाला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रवर्तन संचालनालय (ईडी)च्या नागपूर विभागाने नांदेड येथील बहुचर्चित कोट्यवधी रुपयांच्या रेशन घोटाळा प्रकरणाच्या कारवाईत उद्योजक अजयकुमार चंद्रप्रकाश बाहेती याला मनी लॉण्ड्रिंग कायद्यांतर्गत गुरुवारी अटक केली. शुक्रवारी आरोपीला कोर्टात सादर करण्यात आले. येथे न्यायालयाने आरोपीला ईडीच्या ताब्यात ३ जुलैपर्यंत पाठवले आहे.
ईडीकडून मिळालेल्या माहितीनुसार बाहेतीच्या विरुद्ध नांदेड पोलिसांनी भादंविच्या कलम ४२०, ४०६, ४६७ आदी कलमांनुसार गुन्हा दाखल केला होता. एफआयआरच्या आधारावर ईडीने मे २०२१ मध्ये प्रकरणाचा तपास सुरू केला होता. पोलिसांनी जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत प्रकरणात चार्जशिट दाखल केली आहे. आरोपीच्या जबाबानुसार आरोपीने संघटित टोळी जमवून सार्वजनिक वितरण यंत्रणेद्वारे अवैध तऱ्हेने आर्थिक लाभ घेतला. सोबतच नांदेडमध्ये सरकारी कोट्याच्या रेशन धान्याची सुनियोजित पद्धतीने चोरी करण्यास सुरुवात केली होती. तपासादरम्यान आरोपी गैरकायदेशीर कृत्यांत व अवैध लाभ घेण्यामध्ये सहभागी होता. हा गुन्हा सुनियोजित पद्धतीने केला जात होता. या तऱ्हेने भारतीय खाद्य निगमच्या गोदामांतून पीडीएस खाद्यान्नांचे ट्रक नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील विविध तालुक्यांत पोहोचवले जात होते. तेथे हे ट्रक आरोपी अजयकुमार चंद्रप्रकाश बाहेतीची फॅक्टरी मेसर्स इंडिया ॲग्रो अनाज लिमिटेडमध्ये पाठविले जात होते. या घोटाळ्यात तीन हजारांहून अधिक रेशन दुकाने, दोन जिल्हे व एफसीआयची २८ गोदामे सहभागी होती. शिवाय काही अज्ञात एजंट्स, ट्रेडर्स, व्यापारी व सरकारी अधिकारी सहभागी आहेत. प्रकरणाचा तपास सुरू आहे.