करमणूक कर भरावा लागणार आॅनलाईन
By Admin | Updated: August 4, 2015 03:33 IST2015-08-04T03:33:24+5:302015-08-04T03:33:24+5:30
जिल्हा कार्यालयातील सर्व विभागात आॅनलाईन प्रक्रिया राबविण्यात येत असून करमणूक कर विभागही आता कर प्रणाली

करमणूक कर भरावा लागणार आॅनलाईन
नागपूर : जिल्हा कार्यालयातील सर्व विभागात आॅनलाईन प्रक्रिया राबविण्यात येत असून करमणूक कर विभागही आता कर प्रणाली आॅनलाईन करण्याच्या मार्गावर आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व केबल आॅपरेटर्स आणि सिनेमागृह संचालकांना तसेच कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना आॅनलाईन कर भरावा लागणार आहे.
सर्व शासकीय कार्यालयांना पेपरलेस करून संगणकीकरण करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. त्यानुसार जिल्हा कार्यालयाचा करमणूक कर विभागही आॅनलाईन झाला आहे. सिनेमागृह संचालक व केबल आॅपरेटर्स तसेच विविध मनोरंजक कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांकडून करमणूक शुल्क वसूल करण्यात येतो. आतापर्यंत चालान बुक भरून करमणूक शुल्क भरले जात होते. मात्र यानंतर हे शुल्क आॅनलाईन भरावे लागणार आहे. जिल्ह्यात एकूण २१ सिंगल स्क्रीन सिनेमागृह व चार मल्टिप्लेक्स आहेत. यासह चार मुख्य केबल आॅपरेटर्स (एमएसओ) आहेत. या सर्वांना दर महिन्याला करमणूक कर भरावा लागतो. आता हा कर आॅनलाईन भरावा लागणार आहे. याअंतर्गत सोमवारी जिल्ह्यातील केबल आॅपरेटर्स आणि सिनेमागृह चालकांना जिल्हा कार्यालयाच्या बचत भवनात आॅनलाईन कर भरण्यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले.
करमणूक कर अधिकारी सरिता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार यासाठी शासनाकडून गव्हर्नमेंट रेजिस्ट अकाऊंटिंग सिस्टिम (जीआरएएस) या नावाने वेबसाईट तयार करण्यात आली आहे. सरिता पाटील आणि वित्त लेखा अधिकारी विनय तिवारी यांनी केबल आॅपरेटर्स व सिनेमागृहातील कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली.(प्रतिनिधी)