२३ जूनपासून अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया
By Admin | Updated: June 21, 2014 02:40 IST2014-06-21T02:40:04+5:302014-06-21T02:40:04+5:30
राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रथम वर्ष आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले ..

२३ जूनपासून अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया
नागपूर : राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रथम वर्ष आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून २३ जूनपासून याला प्रारंभ होणार आहे. राज्यभरातील शासकीय व सरकारी महाविद्यालयांची प्रवेशप्रक्रिया ‘कॅप’ मार्फत राबवली जाईल. मोठ्या प्रमाणावर रिक्त राहणाऱ्या जागा भरण्याचे मोठे आव्हान यंदा महाविद्यालयांसमोर आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३ जुलै आहे. नागपूर विभागातील ५८ अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकी प्रथम वर्षाच्या एकूण २३,७०२ जागा आहेत. यंदा बारावीच्या निकालात वाढ झाल्यामुळे नामवंत महाविद्यालयांत प्रवेशासाठी जोरदार चुरस दिसून येण्याची चिन्हे आहेत.
‘जेईई-मेन्स’ आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक व प्रवेशप्रक्रियेबद्दल विद्यार्थ्यांकडून सातत्याने विचारणा होत होती. अखेर शुक्रवारी तंत्रशिक्षण संचालनालयाकडून प्रवेशप्रक्रियेसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली.
यंदादेखील केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया ही आॅनलाईन असेल. तंत्रशिक्षण संचालनालयाने स्थापित केलेल्या निरनिराळ्या ‘एआरसी’तून (अप्लिकेशन अॅन्ड रिसिप्ट सेंटर) विद्यार्थी आपले अर्ज भरू शकतात. एआरसीमध्ये आपला अर्ज दाखल करतानाच विद्यार्थी आपली प्रमाणपत्रे पडताळून घेऊ शकतात.
कशी असेल प्रक्रिया?
अभियांत्रिकीच्या प्रवेशप्रक्रियेत यंदा चार प्रवेश फेऱ्या असतील. पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या फेरीसाठीच्या अर्जात प्रत्येकी १०० पसंतीक्रम भरण्याची संधी देण्यात आली आहे. अखेरच्या फेरीत मात्र ‘कौन्सिलिंग’द्वारे प्रक्रिया राबविली जाईल. पहिल्या फेरीतील विकल्पांपैकी विद्यार्थ्यांचा पहिल्या महाविद्यालयातच क्रमांक लागला तर तेथेच प्रवेश घ्यावा लागेल. त्यानंतरच्या दुसऱ्या फेरीत विकल्पांपैकी पहिल्या तीन महाविद्यालयांपैकी एकातच प्रवेश घ्यावा लागेल आणि त्या उमेदवाराला पुढील फेरीत समाविष्ट होता येणार नाही. तिसऱ्या फेरीत प्रवेश न मिळालेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीतच प्रवेश घ्यावा लागेल. आॅनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर पहिली प्राथमिक यादी ५ जुलै तर अंतिम यादी ९ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येईल.
अभियांत्रिकी महाविद्यालयांची परीक्षा
नागपूर विभागात एकूण ५७ अभियांत्रिकी महाविद्यालये असून यात एकूण २४,३९२ जागा आहेत. मात्र गेल्यावर्षी सहा हजारांवर जागा रिकाम्या राहिल्या होत्या. त्यामुळे यंदा विद्यार्थी आपल्याकडे यावे यासाठी महाविद्यालयांचे निरनिराळ््या तऱ्हेने प्रयत्न सुरू आहेत.
आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा
अर्ज भरायला एआरसीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडे सगळी मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या साक्षांकित झेरॉक्स असणे आवश्यक आहे. दरम्यान आरक्षित प्रवर्गातील जे विद्यार्थी अर्ज पडताळणीच्या वेळी जात वैधता प्रमाणपत्र सादर करू शकणार नाही त्यांना तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. प्रवेश घेतल्यानंतर तीन महिन्यांच्या आत ते जात वैधता प्रमाणपत्र सादर करू शकतात. कागदपत्रे पडताळणीच्या वेळी तशा आशयाचे हमीपत्र सादर करावे लागेल असे निर्देश तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे देण्यात आले आहेत.(प्रतिनिधी)