कर्मचाऱ्यांचा संप, रुग्णांचे हाल
By Admin | Updated: June 22, 2014 01:05 IST2014-06-22T01:05:52+5:302014-06-22T01:05:52+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयातील (मेडिकल) निवासी डॉक्टरांचा संप संपत नाही तोच कर्मचाऱ्यांनी रिक्त पदे भरण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी एक दिवसाचा संप पुकारला.

कर्मचाऱ्यांचा संप, रुग्णांचे हाल
मेडिकल : ४०० कर्मचाऱ्यांचा सहभाग
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयातील (मेडिकल) निवासी डॉक्टरांचा संप संपत नाही तोच कर्मचाऱ्यांनी रिक्त पदे भरण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी एक दिवसाचा संप पुकारला. यामुळे रुग्णसेवेसोबतच कार्यालयीन सेवाही प्रभावित झाली. वॉर्ड आणि शस्त्रक्रियेच्यासमोर विशेषत: जैविक कचरा जागोजागी पडून होता.
मेडिकलमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या ४०० जागा रिक्त आहेत. मागील दहा वर्षांपासून या जागा भरण्यातच आल्या नाहीत. यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडला आहे. याचा फटका रुग्णांनाही बसत आहे. शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र जाती-जमाती कर्मचारी संघाच्यावतीने हा संप पुकारण्यात आला होता. विशेष म्हणजे सलग तीन दिवस निवासी डॉक्टरांच्या संपामुळे मेडिकल प्रशासन अडचणीत आले होते, त्यात कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आज सर्वांचीच तारांबळ उडाली होती. दुपारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चतुर्थ कर्मचाऱ्यांची पदे तत्काळ भरण्यात येतील, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या आश्वासनाचे लेखी पत्रच हातात दिल्याने सायंकाळी हा संप मागे घेण्यात आला.
संपामध्ये सकाळच्या पाळीतील बहुसंख्य कर्मचारी सहभागी झाले होते. यामुळे बाह्यरुग्ण विभागापासून ते वॉर्डात आज सफाईची कामेच झाली नाही. यामुळे वापरलेले ग्लोव्हज, कॉटन, जैविक कचऱ्यासाठी वापरण्यात येत असलेल्या लाल रंगाच्या प्लास्टिकच्या बॅग्स् वऱ्हांड्यात पडून होत्या. कर्मचारी नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनाच आॅक्सिजन सिलिंडर, स्ट्रेचर ओढावे लागले. तर कर्मचाऱ्यांची काही कामे परिचारिकांना करावी लागली. संपाचा फटका अधिष्ठाता कार्यालयालाही बसला. ‘क’ वर्गातील कर्मचारी संपात सहभागी झाल्याने कार्यालयात शुकशुकाट होता. हा संप महाराष्ट्र जाती जमाती कर्मचारी संघाचे केंद्रीय महासचिव आर.सी. अंंभोरे, राजेश निंबाळकर, जिल्हा अध्यक्ष विश्वनाथ खोंडकर व इंटक जिल्हा अध्यक्ष राजेश निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आला.(प्रतिनिधी)