नफ्याऐवजी शस्त्रांच्या गुणवत्तेवर भर द्या : उपाध्याय यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 23:44 IST2019-02-28T23:37:35+5:302019-02-28T23:44:47+5:30
शस्त्रास्त्रांसाठी इतर देशांवर अवलंबुन राहण्याऐवजी देशातील कंपन्यांनी ही गरज लक्षात घेण्याची गरज असून शस्त्र उत्पादकांनी नफ्याऐवजी शस्त्रांच्या गुणवत्तेवर भर द्यावा, हे एक मोठे आव्हान आहे, असे आवाहन मास्टर जनरल ऑफ ऑर्डनन्स (एमजीओ) ले. जनरल एस. के. उपाध्याय यांनी केले.

नफ्याऐवजी शस्त्रांच्या गुणवत्तेवर भर द्या : उपाध्याय यांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शस्त्रास्त्रांसाठी इतर देशांवर अवलंबुन राहण्याऐवजी देशातील कंपन्यांनी ही गरज लक्षात घेण्याची गरज असून शस्त्र उत्पादकांनी नफ्याऐवजी शस्त्रांच्या गुणवत्तेवर भर द्यावा, हे एक मोठे आव्हान आहे, असे आवाहन मास्टर जनरल ऑफ ऑर्डनन्स (एमजीओ) ले. जनरल एस. के. उपाध्याय यांनी केले.
गुरुवारी विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीयल असोसिएशन, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने पहिल्यांदा ‘मेक इन इंडिया’ संमेलन व ग्राहक-विक्रेता बैठकीचे आयोजन करण्यात आले. रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये आयोजित संमेलनाचे उद्घाटन ले. जनरल उपाध्याय यांनी केले. यावेळी ले. जनरल संजय वर्मा, असोसिएशनचे अध्यक्ष ले. जनरल (निवृत्त) रवींद्र थोदगे, सत्यनारायण नुवाल, एअर मार्शल शिरीष देव, वायुसेनेच्या अनुरक्षण कमान मुख्यालयाचे एव्हीएम श्रीरंग चावजी, संजय सोम, कर्नल (निवृत्त) आर. एस. भाटिया व भारतातील स्लोव्हाकियाचे माजी राजदूत एच. ई. जिंगमुड बरटोक उपस्थित होते. ले. जनरल उपाध्याय म्हणाले, स्वदेशी शस्त्र उत्पादक कंपन्यांना चालना देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात येत आहेत. सोबतच शीघ्र प्रक्रिया करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यामुळे विदर्भासह देशातील लघु व मध्यम उद्योगांना चालना मिळू शकेल. उद्घाटन समारंभानंतर विविध विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. पहिले सत्र शस्त्र उत्पादनात खासगी व सार्वजनिक सहायक क्षेत्राच्या रूपाने संधी या विषयावर आयोजित करण्यात आले. दुसरे सत्र अपॉर्च्युनिटी स्पेक्ट्रम व तिसरे सत्र भारतीय सैन्याची गरज या विषयावर आयोजित करण्यात आले. या सत्रात शस्त्र उत्पादन करणाऱ्या विविध कंपन्यांच्या प्रमुखांनी मार्गदर्शन केले.
शस्त्र उत्पादनाशी निगडित प्रदर्शन
संमेलनात शस्त्र उत्पादनाची आवश्यकतेशी निगडित प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यात सीडोडी जबलपूर, वायुसेना अनुरक्षण कमान मुख्यालय, सीएडीडब्ल्यूएफ शिवाय विविध शस्त्र उत्पादनाशी निगडित कंपन्यांनी सहभाग घेतला. संमेलनात सहभागी होण्यासाठी आलेले उत्पादक व कंपनीच्या प्रतिनिधींना प्रदर्शनाच्या माध्यमातून सुरक्षा क्षेत्राच्या गरजांची माहिती देण्यात आली.