नागपूर : देशात लिंबूवर्गीय फळसंशोधन आणि उत्पादकता विकासाला बराच वाव आहे. केंद्रीय लिंबूवर्गीय फळसंशोधन संस्थेच्या माध्यमातून नव्या जाती विकसित करून निर्यातक्षम फळऊत्पादनावर आपला भर असेल, अस मत केंद्रीय लिंबूवर्गीय फळसंशोधन संस्थेचे नवे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. दिलीप घोष यांनी व्यक्त केले.
नागपुरातील केंद्रीय लिंबूवर्गीय फळसंशोधन संस्थेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. लदानिया यांच्या निवृत्तीनंतर डॉ. दिलीप घोष यांची अलीकडेच या पदावर नियुक्ती झाली आहे. या पदासाठी कृषी वैज्ञानिक भरती मंडळ नवी दिल्लीकडून निवड प्रक्रिया राबविण्यात आली होती. उच्चस्तरीय कृषी संशोधन संस्था, भारतीय कृषी संशोधन परिषद, कृषी व केंद्रीय मंत्रालयांतर्गत नागपुरातील ही संस्था काम करते.
लिंबूवर्गीय फळ संशोधनात विविध समस्या आजही आहेत. नवीन क्षेत्रात उत्पादन केंद्राचा विस्तार करणे, कंत्राटी शेतीत हे पीक लोकप्रिय करणे, उत्पन्नवाढीला चालना देणे, अधिक निर्यातक्षम गुणवत्तेची फळे विकसित करणे, शेतीविषयक कृषी यांत्रिकीकरणात वाढ करणे, तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे, ही आपल्यापुढील आव्हाने असल्याचे त्यांनी सांगितले.
...
परिचय
डॉ. दिलीप घोष यांनी नवी दिल्लीच्या पुसा येथील आयएआरआयमधून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर १९९५ मध्ये वैज्ञानिक म्हणून ते नागपुरातील याच संस्थेत रुजू झाले. २६ वर्षांच्या सेवेत लिंबूवर्गीय फळांच्या रोगनिदान साधनांचा विकास करण्यासोबतच
आतापर्यंत ४५ लाखांहून अधिक रोगमुक्त नर्सरींचा विकास त्यांनी केला. शास्त्रज्ञांच्या बहुविभागातील कार्यसंघाचे ते सदस्य होते. क्युटरवालेन्सिया, यूएस पुमेलो-४४४, फ्लेम ग्रेप फ्रूट, एनआरसीसी पुमेलो यासह अन्य नव्या जातींच्या संशोधनासह सिट्रस ग्रिनिंग आजार आणि लिंबूवर्गीय ट्रायटिझा व्हायरससाठी कमी खर्चाचे जलद निदान साधन त्यांनी विकसित केले. आंतरराष्ट्रीय एफएओ सल्लागार म्हणून नेपाळ आणि भूतानमध्ये सेवा दिली असून, अनेक पेटंट त्यांच्या नावे आहेत.
...
कोट
ही मोठी जबाबदारी आहे. या फळ उद्योगाच्या विकासासाठी योग्य व अनुभवी असलेल्या युवा गटाला वैज्ञानिक दिशा देण्याची ही नवीन सुरुवात आहे. महासंचालक आणि उपसंचालक (फलोत्पादन) यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक म्हणून समर्पकपूर्वक आपला आणि या संस्थेचा सहभाग असेल.