शिक्षणव्यवस्थेत बदलांवर जोर

By Admin | Updated: March 16, 2015 02:15 IST2015-03-16T02:15:18+5:302015-03-16T02:15:18+5:30

केंद्रात सत्ताबदल झाल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात नवीन उत्साह संचारला आहे. समाजात संघाची पाळेमुळे मजबूत करायची असेल तर ...

Emphasis on changes in education system | शिक्षणव्यवस्थेत बदलांवर जोर

शिक्षणव्यवस्थेत बदलांवर जोर

योगेश पांडे नागपूर
केंद्रात सत्ताबदल झाल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात नवीन उत्साह संचारला आहे. समाजात संघाची पाळेमुळे मजबूत करायची असेल तर सामाजिक क्षेत्रासोबतच शिक्षणक्षेत्राकडेदेखील विशेष लक्ष देण्याचा निर्णय संघाने घेतला आहे. रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात पार पडलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत याचेच प्रतिबिंब दिसून आले. संघाच्या सभेत शिक्षण विषयावर जास्त प्रमाणात मंथन झाले. पारंपरिक मूल्यांचा अभ्यासक्रमात समावेश व्हावा, अशी भुमिका प्रतिनिधींनी यावेळी मांडली अशी माहिती सूत्रांनी दिली. यंदा संमत करण्यात आलेले दोन प्रस्तावदेखील शिक्षणक्षेत्राशीच संबंधित होते हे विशेष.
साधारणत: संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत साधारणत: आर्थिक किंवा सामाजिक प्रस्ताव मांडले जातात. शैक्षणिक अभ्यासक्रमांत योगविद्येचा समावेश करण्यात यावा व प्राथमिक शिक्षण मातृभाषेत देण्यात यावे हे प्रस्ताव यंदा संमत करण्यात आले. हे दोन्ही प्रस्ताव कुठेना कुठे शिक्षणव्यवस्थेशी संबंधित होते. याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने केंद्र व राज्य शासनांना संघातर्फे आवाहनदेखील करण्यात आले. या प्रस्तावांवरील चर्चेच्या अनुषंगाने शिक्षणप्रणालीत बदल किती आवश्यक आहे यावरदेखील प्रतिनिधींनी मत मांडले. देशातील ब्रिटिशकालीन शिक्षणव्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता असून भारतीय संस्कृतीच्या मूल्यांचा यात समावेश करायला हवा. शिक्षणातूनच नवीन पिढीवर संस्कार होतात. त्यामुळे शिक्षणप्रणालीतील पाश्चिमात्य देशांचा प्रभाव दूर करून भारतीय संस्कृतीचे दर्शन यातून जास्तीत जास्त कसे होईल यासंदर्भात चर्चेवर जोर होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.
शिक्षणतज्ज्ञांचे मार्गदर्शन हवे
यासंदर्भात सरकार्यवाह भय्याजी जोशी यांना ‘लोकमत’ प्रतिनिधीने विचारणा केली असता त्यांनी शिक्षणक्षेत्रात सकारात्मक बदल आवश्यक असल्याचे मत मांडले. सभेत या विषयावर सखोल चर्चा होऊ शकली नाही. परंतु संक्षिप्तपणे प्रतिनिधींनी आपले मत मांडले. नेमका काय व कशा तऱ्हेने बदल हवा यावर शिक्षणतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याची गरज असल्याचेदेखील ते म्हणाले.
सरसंघचालकांनी मांडली होती भूमिका
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात गुजरात येथील पुनरुत्थान विद्यापीठाच्यावतीने नागपुरातच अखिल भारतीय विद्वत परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. शैक्षणिक अभ्यासक्रमांत संघाचा ‘अजेंडा’ समाविष्ट करण्याबाबत या परिषदेत मंथन करण्यात आले होते. जुन्या शिक्षणप्रणालीला लोक कंटाळले असून शिक्षणक्षेत्रात सकारात्मक परिवर्तन व्हायला हवे, अशी भूमिका सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी मांडली होती.
‘रोडमॅप’ तयार होतोय
अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत शिक्षणक्षेत्राशी संबंधित काही मुद्यांवरच चर्चा झाली असली तरी आवश्यक बदलांवर संघाकडून ‘होमवर्क’ सुरू आहे. शिक्षणप्रणालीतून लुप्त होत चाललेली भारतीय मूल्ये परत रुजविण्यासाठी नेमके काय केले पाहिजे यासाठी संघ परिवारातील शिक्षणतज्ज्ञ सखोल अध्ययन करत आहेत. विद्यापीठ, माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षणाचा एकमेकांशी संबंध प्रस्थापित करणे, व्यापक परंतु सर्वसमावेशक अभ्यासक्रम लागू करणे, संशोधन पद्धतीत बदल आणणे या मुद्यांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे, अशी माहिती संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर दिली.

Web Title: Emphasis on changes in education system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.