भावनिक आरोग्यासाठी मनावर नियंत्रण आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:44 IST2019-01-23T00:42:52+5:302019-01-23T00:44:49+5:30
प्रजापिता ब्रह्माकुमारीज विश्वविद्यालयातर्फे विश्वशांती सरोवर, जामठा येथे मंगळवारी आंतरराष्ट्रीय वक्ता ब्रह्माकुमारी शिवानी दीदी यांचे ‘भावनिक आरोग्य’ विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, आपल्याला शारीरिक आरोग्य माहीत आहे, मात्र भावनिक आरोग्याबाबत अनभिज्ञ आहोत. त्याचे आकलन स्वत: करणे गरजेचे आहे.

भावनिक आरोग्यासाठी मनावर नियंत्रण आवश्यक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रजापिता ब्रह्माकुमारीज विश्वविद्यालयातर्फे विश्वशांती सरोवर, जामठा येथे मंगळवारी आंतरराष्ट्रीय वक्ता ब्रह्माकुमारी शिवानी दीदी यांचे ‘भावनिक आरोग्य’ विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, आपल्याला शारीरिक आरोग्य माहीत आहे, मात्र भावनिक आरोग्याबाबत अनभिज्ञ आहोत. त्याचे आकलन स्वत: करणे गरजेचे आहे. सुखी जीवनासाठी भावनिक आरोग्य सुदृढ असणेही तेवढेच आवश्यक आहे. आपल्या आत जेवढा अहंकार असेल तेवढे भावनिक आरोग्य कमी असते. अपेक्षाही भावनिक आरोग्याशी जोडल्या जाऊ शकतात. आपण विचार करतो तसेच व्हावे, ही अपेक्षा व्यर्थ आहे. आपल्या दु:खाचे कारण दुसऱ्याला मानले जाते. वर्तमान काळात थकलेल्या मनाने लोक मोठेमोठे कार्य करतात. त्यामुळे तणाव ही नित्याची गोष्ट झाली असून यामुळे भावनिक आरोग्य प्रभावित होत आहे. यासाठी आवश्यक आहे की आपण आपल्या मनात कचरा पसरू देऊ नये. मन स्वच्छ ठेवणे हे प्रथम कर्तव्य आहे. मनावर नियंत्रण राहील तर भावनिक आरोग्य सुदृढ राहील, असा संदेश त्यांनी दिला.
शिवानी दीदी पुढे म्हणाल्या, मनावर कंट्रोल नसेल तर मुलांना संस्कार देऊ शकणार नाही. त्यामुळे तुमचे जीवन संयम आणि सन्मानाने भरलेले असावे. मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी घरातील वातावरण आध्यात्मिक असणे आवश्यक आहे. गरजू व गरजवंतांच्या मदतीसाठी हात पुढे केल्यास त्याचे समाधान आपल्या जीवनात लाभते. आपल्याला आयुष्यात जे शिखर गाठायचे आहे त्यानुसार वाचन व मनन करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमचे वाचन सात्विक असणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. नागपूरच्या संचालिका ब्रह्माकुमारी रजनी दीदी यांनी स्वागत भाषण केले. रंजना अग्रवाल व नीलिमा दिवटे यांनी त्यांचे स्वागत केले. संचालन ब्रह्माकुमारी मनिषा दीदी यांनी केले. यावेळी जवळपास ५००० लोकांनी त्यांच्या व्याख्यानाचा लाभ घेतला.