बंगलोर-दिल्ली विमानाचे नागपुरात आकस्मिक लँडिंग; अखेरीस रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 14:03 IST2019-05-11T13:09:46+5:302019-05-11T14:03:16+5:30
बंगलोरहून दिल्लीकडे जात असलेल्या विमानाचे काही तांत्रिक कारणांमुळे नागपूर विमानतळावर शनिवारी पहाटे दीड वाजता आकस्मिक लँडींग करण्यात आले.

बंगलोर-दिल्ली विमानाचे नागपुरात आकस्मिक लँडिंग; अखेरीस रवाना
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: विमानाच्या फ्युएल इंडिकेटरमध्ये बिघाड झाल्यामुळे स्पाईस जेटचे बेंगळुरू येथून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे शुक्रवारी रात्री १.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आकस्मिक लॅण्डिंग करण्यात आले. प्रवाशांना विमानतळावर ताटकळत राहावे लागले.
प्रवाशांना कुठलीही माहिती न देताना पहाटे ५.३० वाजेपर्यंत विमानात बसवून ठेवले. त्यानंतर त्यांना विमानातून उतरविण्यात आले. त्यामुळे प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागला. विमानात एकूण १५३ प्रवासी होते. यादरम्यान एक महिलेची प्रकृती बिघडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बेंगळुरू येथून उड्डाण भरणारे विमान रात्री १२.४५ वाजता दिल्लीला पोहोचते. पण तांत्रिक कारणांमुळे विमानाचा मार्ग बदलून ते नागपुरात उतरविण्यात आले. स्पाईसजेट विमान कंपनीचे काऊंटर नागपुरात नसल्यामुळे प्रवासी अन्य काऊंटरवर चौकशी करीत असताना कुणीही दाद दिली नाही.
दिल्ली येथील प्रवासी अरविंद गुगलानी यांनी सांगितले की, बेंगळुरू येथून शुक्रवारी रात्री १० वाजता विमानाने उड्डाण भरले. रात्री १२.४५ ते १ च्या दरम्यान विमान दिल्लीला पोहोचते. पण रात्री १.३० च्या सुमारास विमान नागपूर विमानतळावर उतरविले. विमान का उतरविले, याबद्दल कुणीही सांगितले नाही. पहाटे ५.३० पर्यंत विमानातच बसवून ठेवले. त्यानंतर विमानतळावर उतरविण्यात आले. दिल्लीला नेणारे विमान केव्हा येणार याची विमानतळावरील अन्य कंपन्यांच्या काऊंटरवर चौकशी केली असता कुणीही सांगण्यास तयार नव्हते. विमानतळ प्राधिकरणाने केवळ चहा आणि पाण्याची व्यवस्था केली.
यादरम्यान एका प्रवाशाला अपेंडिक्सचा त्रास होता. त्यांच्यासाठी रुग्णवाहिका आणायला अर्धा तास विलंब झाला. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
विमान सकाळी ११.३० वाजता दिल्लीकडे रवाना
अखेर स्पाईसजेट कंपनीने दुसऱ्या विमानाची करून प्रवाशांना दिल्लीला रवाना केले. हे विमान सकाळी ११.३० नागपुरातून निघून दुपारी १.२० वाजता दिल्लीत पोहोचल्याचे माहिती गुगलानी यांनी दिली.