धनत्रयोदशीला इलेक्ट्रॉनिक्स, सराफा, ऑटोमोबाईल, कापड बाजारात उत्साह
By मोरेश्वर मानापुरे | Updated: November 10, 2023 20:15 IST2023-11-10T20:15:05+5:302023-11-10T20:15:17+5:30
बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी झुंबड

धनत्रयोदशीला इलेक्ट्रॉनिक्स, सराफा, ऑटोमोबाईल, कापड बाजारात उत्साह
नागपूर : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या धनत्रयोदशीला सराफा, इलेक्ट्रॉनिक्स, कापड आणि ऑटोमोबाईल बाजारात ग्राहकांची झुंबड होती. लोकांनी खऱ्या अर्थाने धनत्रयोदशीलाच लक्ष्मीपूजनाचे फटाके फोडले. शुक्रवारी बाजारात सर्वच बाजारपेठांमध्ये कोट्यवधींची उलाढाल झाली.
ग्राहकांचा उत्साहाने उलाढालीचा आकडा वाढला
सराफा व्यापारी म्हणाले, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचे दागिने आणि चांदीची उपकरणे खरेदीसाठी लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. गर्दीपासून बचावासाठी लोक सकाळपासूनच सराफांच्या दुकानात आले. सर्वांनीच आवडीच्या डिझाईनचे दागिने आणि सोने व चांदीचे नाणे खरेदी केले. तर बुकिंग केलेले दागिने घरी नेले. सोन्याच्या भावाचा त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही. लोकांनी उत्साहात खरेदी केली. सराफांकडे सुरू असलेल्या विविध योजनांना फायदा घेतला. नागपुरातील २ हजारांहून अधिक सराफा दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी होती. लोकांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे सराफांनी सांगितले.
इलेक्ट्रॉनिक्स दुकानांमध्ये गर्दी
श्रीकांत भांडारकर म्हणाले, धनत्रयोदशीला लोक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडले. लोकांनी मुहूर्त साधून मनमुराद खरेदी केली. सर्वच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना मागणी होती. ग्राहकांच्या स्वागतासाठी संचालकांनी शोरूमची आकर्षक सजावट केली होती. नामांकित कंपन्यांचे एलईडी, वॉशिंग मशीन, फ्रिज, मायक्रोवेव्ह ओव्हन, मोबाईल, लॅपटॉप याशिवाय ग्राहकोपयोगी उपकरणांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. ग्राहकांनी विविध कंपन्यांच्या फायनान्स योजनांचा फायदा घेतला. सर्वाधिक मागणी एलईडी, फ्रिज आणि वॉशिंग मशीनला होती. दिवाळीनिमित्ताने नामांकित कंपन्यांनी सुरू केलेल्या योजनांचा फायदा ग्राहकांना मिळाला. नागपुरात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात कोट्यवधींची उलाढाल झाली.
ऑटोमोबाईल क्षेत्रातही उत्साह
ऑटोमोबाईल क्षेत्रातही उत्साह होता. दसऱ्यानंतर या दिवशी दुचाकी आणि चारचाकीची सर्वाधिक विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. आधीच बुकिंग केलेल्या गाड्या लोकांनी घरी नेल्या. विविध दुचाकी व चारचाकी कंपन्यांच्या योजनांचा ग्राहकांनी फायदा घेतला.
इतवारी, गांधीबागेत सर्वच दुकाने ‘फूल्ल’
इतवारी, गांधाबाग, तीननल चौकातील रेडिमेड गारमेंट आणि साड्यांची दुकाने ‘फूल्ल’ होती. ग्राहकांना पाय ठेवायलाही जागा नव्हती. सर्वजण कुटुंबीयांसह खरेदीसाठी आले होते. याशिवाय सजावटीच्या दुकानातही गर्दी पाहायला मिळाली. एकंदरीत बाजारपेठांमध्ये खरेदीची प्रचंड उत्साह दिसून आला.