वीज कर्मचाऱ्यांनी केली पीएफ आयुक्तांच्या पत्रकाची होळी

By Admin | Updated: June 13, 2017 01:57 IST2017-06-13T01:57:41+5:302017-06-13T01:57:41+5:30

भविष्य निर्वाह निधी आयुक्तांद्वारे वाढीव निवृत्ती वेतनाबाबत घेतलेल्या निर्णयामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.

The electricity workers took the letter of the PF Commissioner | वीज कर्मचाऱ्यांनी केली पीएफ आयुक्तांच्या पत्रकाची होळी

वीज कर्मचाऱ्यांनी केली पीएफ आयुक्तांच्या पत्रकाची होळी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भविष्य निर्वाह निधी आयुक्तांद्वारे वाढीव निवृत्ती वेतनाबाबत घेतलेल्या निर्णयामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. नुकतेच सेवानिवृत्त वीज कर्मचाऱ्यांनी पीएफ आयुक्तांच्या पत्रकांची होळी करून त्यांच्या निर्णयाचा निषेध केला.
अ.भा. सेवानिवृत्त कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने नुकतेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या गड्डीगोदाम कार्यालयातील सभागृहात सेवानिवृत्त वीज कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश येंडे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या मेळाव्यात संघटनेचे महासचिव प्रकाश पाठक, राज्य शाखेचे समन्वयक रणजितसिंह बघेल, आर.यू. केराम, सी.बी. सिंह, दादा झोडे, वीज कामगार इंटकचे सहसचिव भास्कर गायकवाड आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या मेळाव्यानंतर पीएफ आयुक्तांच्या पत्रकाची होळी करून निषेध करण्यात आला. प्रकाश येंडे यांनी सांगितले, सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर २०१६ ला दिलेल्या निकालात सेवानिवृत्ती वेतनाबाबत कोणताही भेदभाव न करता १९९५ च्या सेवानिवृत्ती योजनेप्रमाणे ज्यांना निवृत्ती वेतन मिळत आहे त्या सर्व कर्मचाऱ्यांना वाढीव निवृत्ती वेतन मिळण्यास पात्र ठरविले होते. मात्र पीएफ कमिशनर मुकेश कुमार यांनी ३१ मे २०१७ ला दुरुस्तीपत्रक काढून पूर्ण वेतनावर कपात केलेला १२ टक्के पीएफ निवृत्ती वेतन निधीत जमा न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाढीव निवृत्ती वेतनापासून अपात्र ठरविण्याचा निर्णय जाहीर केला होता. न्यायालयाच्या निर्देशाचा अपमान करून घेतलेला हा निर्णय निवृत्त कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक असल्याचा आरोप येंडे यांनी केला. कर्मचाऱ्यांना याबाबत जागृत करण्यासाठी येत्या १२ आॅगस्टला नागपुरात भव्य अधिवेशनाचे आयोजन करण्यात येणार असून, यामध्ये देशभरातील दोन लाख कर्मचारी सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन मुख्य संयोजक प्रकाश पवार यांनी केले. पुरुषोत्तम सोनटक्के यांनी आभार मानले.

Web Title: The electricity workers took the letter of the PF Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.