विदर्भ साहित्य संघाच्या पदाधिकाऱ्यांची निवड
By Admin | Updated: April 4, 2016 05:49 IST2016-04-04T05:49:39+5:302016-04-04T05:49:39+5:30
विदर्भ साहित्य संघाच्या २०१६ ते २१ या कार्यकाळासाठी निर्वाचित अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली

विदर्भ साहित्य संघाच्या पदाधिकाऱ्यांची निवड
नागपूर : विदर्भ साहित्य संघाच्या २०१६ ते २१ या कार्यकाळासाठी निर्वाचित अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांची आणि समिती प्रमुखांची आज निवड करण्यात आली. यात प्रत्येक सदस्यालाच संतुष्ट करण्याचा प्रयत्न म्हैसाळकरांनी केला आहे. महामंडळावर डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, डॉ. विलास चिंतामण देशपांडे आणि डॉ. इंद्रजित ओरके यांची निवड करण्यात आली. तर विदर्भ साहित्य संघाच्या सरचिटणीसपदी विलास मानेकर आणि उपाध्यक्ष म्हणून डॉ. जोशी, वामन तेलंग आणि डॉ. राजन जयस्वाल यांची निवड करण्यात आली. ही घोषणा बैठकीनंतर मनोहर म्हैसाळकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
महामंडळावर कोणत्या सदस्यांची निवड करण्यात येणार म्हणून चांगलीच चर्चा रंगली होती. महामंडळावर जाण्यासाठी अनेक नावे शर्यतीत होती पण त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे महामंडळावर निवड झालेल्या सदस्यांचे चेहरे फुलले होते तर ज्यांची निवड करण्यात आली नाही त्यांच्या चेहऱ्यावर हतबलताही होती. त्यात डॉ. जोशी यांनी महामंडळाला चांगलेच लांबलचक पत्र लिहून काही कलमी कृती आराखडा दिला होता. महामंडळाच्या कार्यशैलीवरही त्यांनी पत्रातून काही ताशेरे ओढले होते. विदर्भ साहित्य संघाच्या घटनेप्रमाणे साहित्य संघाचे अध्यक्ष महामंडळाचे अध्यक्ष असावेत, असा नियम आहे. आतापर्यंत त्याप्रमाणेच घडले. पण प्रकृतीचे कारण समोर करीत विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी महामंडळाचे अध्यक्ष होणे टाळले. महामंडळाचा अध्यक्ष झाल्यावर डॉ. श्रीपाद जोशी त्रासदायक ठरू शकतात, हे ओळखून त्यांनाच महामंडळावर नेण्याची क्लृप्ती म्हैसाळकरांनी केली असल्याची चर्चा सध्या साहित्य क्षेत्रात दबक्या आवाजात सुरू आहे.