वृद्ध दांपत्याने घेतले विष, ८० वर्षीय होमियोपॅथी तज्ज्ञ पतीचा मृत्यू
By योगेश पांडे | Updated: August 6, 2025 20:16 IST2025-08-06T20:16:02+5:302025-08-06T20:16:47+5:30
पत्नी आयसीयूमध्ये अत्यवस्थ : वृद्धावस्था व आजारपणाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल

Elderly couple consumes poison, 80-year-old homeopathic expert husband dies
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकमेकांचीच साथ असलेल्या वृद्ध दांपत्याने घरीच बुधवारी सकाळी विषप्रशान केले. यात होमियोपॅथी तज्ज्ञ असलेल्या ८० वर्षीय पतीचा मृत्यू झाला तर पत्नी इस्पितळात अत्यवस्थ अवस्थेत जीवनमरणाचा संघर्ष करत आहे. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समर्थ नगरी येथे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वृद्धावस्था व आजारपणाला कंटाळून या दांपत्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
मृत व्यक्तीचे नाव ८० वर्षीय गंगाधरराव बालाजी हरणे असे असून निर्मला हरणे (७०) या त्यांच्या पत्नी आहेत. दोघेही समर्थनगरीतील प्लॉट क्रमांक १०४ येथे राहत होते. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. मुलगा सुधीर नोकरीनिमित्त बाहेरील राज्यात राहतो तर मुलगी शुभांगी ही सासरी असते. कोरोनानंतर हरणे दाम्पत्याची प्रकृती बरेचदा बिघडली होती. गंगाधररावांवर शस्त्रक्रियाही झाली होती. उपचार घेतल्यानंतरही वृद्धापकाळामुळे आराम मिळाला नाही. यामुळे दोघेही नैराश्यात होते. आपल्यानंतर आपल्या पत्नीचे कसे होईल याची हरणे यांना चिंता होती. त्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी सकाळी दोघांनीही विष प्राशन केले. सकाळी ८ वाजता शेजाऱ्यांनी घराच्या व्हरांड्यात हरणे दाम्पत्याला पडलेले पाहिले. त्यांच्या तोंडातून फेस येत होता. जवळच दोन प्लास्टिक ग्लास ठेवले होते. शेजाऱ्यांनी हरणे दाम्पत्याची मुलगी शुभांगी हिला कळवले. मुलगी लगेच घरी पोहोचली. मुलीने शेजाऱ्यांच्या मदतीने तिच्या पालकांना रुग्णालयात पाठवले. घराचा दरवाजा बंद होता. त्याची चावी बाजूलाच ठेवली होती. रुग्णालयात नेले असता हरणे यांना मृत घोषित करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सोनेगाव पोलीस ठाण्याचे पथकदेखील पोहोचले.
सुसाईड नोटमुळे समोर आले आत्महत्येचे कारण
पोलिसांनी घराची झडती घेतली. हरणे दाम्पत्याची सुसाईड नोट सोफ्यावर ठेवण्यात आली होती. कचऱ्याच्या डब्यात विषाचा डबीदेखील सापडली. आत्महत्येचे कारण सुसाईड नोटमधून उघड झाले. चिठ्ठीत हरणे यांनी वृद्धापकाळ, आजार आणि एकाकी जीवनामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. कुटुंबातील सदस्यांनी घेतलेली काळजी आणि उपचारांबद्दल त्यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले आणि स्वेच्छेने आत्महत्या केल्याचे नमूद केले. सोनेगाव पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.