नागपुरात दोन दिवसात विकली आठ लाखाची एमडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 07:00 IST2020-11-02T07:00:00+5:302020-11-02T07:00:12+5:30
Crime Nagpur News गुन्हे शाखेच्या हाती लागलेल्या कुख्यात करीम लाला याने दोन दिवसात आठ लाखाची एमडी विकली. करीमचा विश्वस्त असलेला सनी मखिजा ऊर्फ सन्नी सिंधी याची विचारपूस केल्यानंतर त्याने याला दुजोरा दिला.

नागपुरात दोन दिवसात विकली आठ लाखाची एमडी
जगदीश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनच्या दरम्यान लोकांना दोन वेळचे पोट भरणे अवघड होते, त्या काळात शहरात अमली पदार्थाची तस्करी करणारे एमडीच्या विक्रीतून रोजचे लाखो रुपये कमवित होते. गुन्हे शाखेच्या हाती लागलेल्या कुख्यात करीम लाला याने दोन दिवसात आठ लाखाची एमडी विकली. करीमचा विश्वस्त असलेला सनी मखिजा ऊर्फ सन्नी सिंधी याची विचारपूस केल्यानंतर त्याने याला दुजोरा दिला.
गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने करीम लाला याला दोन लाख रुपयांच्या एमडीसह अटक केली होती. करीम अनेक वर्षापासून जुगार अड्डे चालवितो. जुगार खेळणाऱ्यांना एमडीचे व्यसन असल्याने तो एमडीची तस्करी करीत होता. त्याच्या अड्ड्यावर नियमित येणारे जुगारी त्याच्याकडून एमडी खरेदी करीत होते. करीम हा सनीसह चार ते पाच साथीदारांच्या मदतीने एमडीची तस्करी करीत होता. मार्च महिन्यात लॉकडाऊन लागल्याने लोकांचे हाल होत होते. अशात करीम व त्याचे साथीदार एमडीची तस्करी करीत होते. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करीमच्या साथीदारांनी ४ लाख रुपये किंमतची २५० ग्राम एमडी नागपुरात आणली होती. दोन दिवसात २५० ग्राम एमडी ८ लाख रुपयांत विकली. जुगार अड्ड्यावर येणारे जुगारी व क्रिकेट बुकींनी ही एमडी खरेदी केली.
करीम पोलिसाच्या हाती लागल्यानंतर सनी फरार झाला. शनिवारी तो पोलिसांच्या हाती लागला. त्याने चौकशीत दोन दिवसात आठ लाख रुपयांची एमडी विकल्याची कबुली दिली. सनी जुगार खेळातील मास्टर आहे. तो हातचालाखी करून खेळाची बाजी पलटवतो. करीमने जुगाराच्या खेळात हातचालाखी करून बरीच संपत्ती जमविली आहे. सनी सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत आहे. त्याच्या चौकशीत अनेक तथ्य उघडकीस येऊ शकतात.
- करीमच्या साथीदाराचे मुंबईत पलायन
करीमच्या नेटवर्कमध्ये क्रिकेट बुकीसह अनेक गुन्हेगार सुद्धा आहे. २६ ऑक्टोबरला करीम पोलिसांच्या हाती लागला. २७ ऑक्टोबरच्या सकाळी करीमचे साथीदार विमानाने मुंबईकडे रवाना झाले. करीमच्या साथीदारांसोबत शहरातील काही व्हाईट कॉलर लोकं सुद्धा जुळलेले आहे. त्यांना एमडी बरोबरच मुलीही पुरविल्या जात असल्याची माहिती आहे. अमली पदार्थाच्या तस्करांनी जमविलेली संपत्ती ताब्यात घेऊन, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्यास तस्करीला आळा बसू शकतो. पोलिसांनी या दिशेने पाऊल उचलले आहे.