एका सेकंदात अंड्याची कोंबडी !
By Admin | Updated: November 20, 2014 01:03 IST2014-11-20T01:03:31+5:302014-11-20T01:03:31+5:30
एका सेकंदात अंड्याची कोंबडी होते, हवेच्या दाबामुळे पाण्याने भरलेली बाटली रॉकेटसारखी उडायला लागते अन् कागद पेटविल्यानंतर त्याचा धूर वर जायचा सोडून खालच्या दिशेने जातो असे

एका सेकंदात अंड्याची कोंबडी !
अपूर्व विज्ञान मेळा : विद्यार्थ्यांनी उलगडले विज्ञानामुळे घडणारे चमत्कार
नागपूर : एका सेकंदात अंड्याची कोंबडी होते, हवेच्या दाबामुळे पाण्याने भरलेली बाटली रॉकेटसारखी उडायला लागते अन् कागद पेटविल्यानंतर त्याचा धूर वर जायचा सोडून खालच्या दिशेने जातो असे बुचकाळ्यात टाकून उत्सुकतेचा विषय ठरणारे प्रयोग पाहावयास मिळाले ते उत्तर अंबाझरी मार्गावरील राष्ट्रभाषा प्रचार सभेच्या परिसरात आयोजित अपूर्व विज्ञान मेळ््यात.नागपूर महानगरपालिका आणि असोसिएशन फॉर रिसर्च अॅन्ड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन नागपूरच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रभाषा प्रचार सभेत अपूर्व विज्ञान मेळाचे आयोजन करण्यात आले. मेळ्याचे उद्घाटन महापौर प्रवीण दटके यांनी फीत कापून केले. यावेळी उपमहापौर मुन्ना पोकुलवार, नगरसेवक रमेश शिंगारे, संजीव पांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. अपूर्व विज्ञान मेळ्यात नागपूर महानगरपालिकेच्या २० शाळांमधील २०० विद्यार्थी सहभागी झाले असून ते या मेळ्याला भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या मॉडेलबाबत माहिती देत आहेत. मेळ्यात एकूण १०० विविध प्रकारचे प्रयोग ठेवण्यात आले आहेत. दिवसभर विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी भेट देऊन विज्ञानामुळे घडणाऱ्या चमत्कारांची माहिती जाणून घेतली. (प्रतिनिधी)
हलणारी शेंडी
या प्रयोगातील वैज्ञानिक दृष्टिकोन सांगताना विवेकानंदनगर हिंदी प्राथमिक शाळेचा रोमील बाहेश्वर म्हणाला, आपल्या डोळ्यातील पडदा म्हणजे रेटीनावर एखाद्या वस्तूची प्रतिमा पडल्यास तो ती प्रतिमा दाबून ठेवतो. लगेच दुसरी प्रतिमा पडली की दुसरी प्रतिमा रेटीनात साठवल्या जाते. त्यामुळे दोन वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तीची विरुद्ध दिशेला असलेली शेंडी हलताना दिसते.
मॅजिक बॉक्स अंडा मुर्गी
शेषराव वानखेडे स्कूलची विद्यार्थिनी नंदिनी बोंद्रे हिने मॅजिक बॉक्स अंडा मुर्गी हा विज्ञानाचा प्रयोग सादर केला. यात तिने एल आकाराचा एक बॉक्स तयार केला. या बॉक्सच्या दोन्ही बाजूला वरच्या भागात तिने दोन खिडक्या तयार केल्या. बॉक्सच्या मध्ये एक पारदर्शक काच लावला. एका भागात अंडे आणि दुसऱ्या भागात कोंबडीचे चित्र ठेवले. त्यानंतर पुढील भागात असलेल्या छोट्याशा छिद्रातून तिने आत पाहावयास सांगून एका बाजूची वरची खिडकी उघडली असता काचेतून एक अंडे दिसले. त्यानंतर तिने ती खिडकी बंद करून दुसऱ्या भागातील खिडकी उघडली असता कोंबडीचे चित्र दिसले. नंतर तिने दोन्ही खिडक्या उघडल्या असता अंडे आणि कोंबडी दोन्हीची प्रतिमा स्पष्ट दिसत होती.
बॉटल शॉवर
आकृती बनसोड या विद्यार्थिनीने बॉटल शॉवर हा प्रयोग सादर केला. तिने एका पाण्याच्या बाटलीला खालच्या बाजूने सुईच्या आकाराचे छिद्र पाडले. त्यानंतर बाटलीच्या झाकणावर एक छिद्र पाडले. बाटलीच्या वरच्या झाकणावर बोट ठेवले की शॉवर बंद व्हायचा आणि बोट काढले की शॉवर सुरू व्हायचा. बाटलीच्या झाकणावरील बोट काढल्यानंतर झाकणातील छिद्रातून आत हवा जाते आणि ती पाण्याला खाली लोटते. बाटलीच्या झाकणावर बोट ठेवले की हवा आत जाण्याचा रस्ता बंद होऊन शॉवरही बंद होत असल्याचे तिने सांगितले.
वॉटर रॉकेट
आनंद बनसोड आणि रोहित जाधव या विद्यार्थ्यांनी वॉटर रॉकेट हा प्रयोग सादर केला. त्यांनी एका पाण्याच्या बाटलीत अर्धे पाणी भरले. बाटलीच्या अर्ध्या भागात हवा असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी ही बाटली सायकलमध्ये हवा भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पंपाला लावून बाटलीत हवा भरली. यावेळी पाणी बाटलीच्या तोंडाशी आले होते. बाटलीत पूर्वीच अर्धी हवा होती आणि पंपाने हवा दिल्यामुळे काही सेकंदानंतर ही बाटली रॉकेटसारखी वेगाने पुढे गेल्याचे दिसले. हवेच्या दाबामुळे हे घडत असल्याचे त्यांनी सांगितले.
लिफ्ट हेवी वुईथ लाईट
लखनसिंग आणि प्रितमेश्वर हेडाऊ या विद्यार्थ्यांनी लिफ्ट हेवी वुईथ लाईट या प्रयोगात एका हलक्या रबराच्या एका टोकाला दोरी गुंडाळली आणि एका पाईपमधून दुसरी दोरी खालच्या बाजूला सोडून दुसऱ्या टोकाला वीट बांधली. त्याने वरच्या रबराला गोल गोल फिरविले की खालची विट पाईपच्या वरच्या दिशेला चढत असताना दिसले.
एक करू शकतो १०० जण नाही
कुठल्याही फुग्याला टुथपिक मारली की धारदार टुथपिकमुळे तो फुगा पटकन फुटतो. परंतू १०० टुथपिकचा गठ्ठा फुग्याला मारल्यावरही फुगा फुटत नाही, हा प्रयोग विवेकानंदनगर हिंदी प्राथमिक शाळेच्या दुर्वासा पटेल या विद्यार्थ्याने सादर केला. एक टुथपिकचे वजन फुग्याला फोडते कारण पुर्ण फुग्याचे वजन त्या एका टुथपिकवर पडते. परंतू १०० टुथपिक फुग्याला मारल्यास फुग्याचे वजन १०० टुथपिकवर विभागल्या जाते आणि फुगा फुटत नसल्याचे त्याने सांगितले.
धूराने बदलविला आपला मार्ग
साधारणत: कुठलीही वस्तू पेटविली की त्याचा धूर वर आकाशाच्या दिशेने जातो. परंतु दुर्गानगर हायस्कूलच्या व्यंकटेशन नघाटे याच्या प्रयोगात मात्र भलतेच घडले. त्याने एका पाण्याच्या बाटलीला मधोमध छिद्र पाडले. बाटलीचे झाकण बंद केले. बाटलीच्या छिद्राला कागद लावला आणि तो पेटवला. कागद जळत असताना त्याचा धूर बाटलीत जात होता. परंतु तो धूर बाटलीच्या वरच्या दिशेने न जाता खालच्या बाजूला जात होता. या मागील विज्ञान सांगताना त्याने धूर बाटलीत जाताना तो कागदातून जात असताना थंड होतो आणि थंड धूर वरच्या बाजूला नव्हे तर खालच्या दिशेने जात असल्याचे सांगितले.