सावित्रीबाईंच्याच प्रेरणेने महिलांमध्ये शैक्षणिक क्रांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:21 IST2021-01-08T04:21:15+5:302021-01-08T04:21:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सावित्रीबाई फुले यांचे महिलांसाठीचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. त्यांच्याच प्रेरणेने भारतातील महिलांमध्ये शैक्षणिक क्रांती ...

सावित्रीबाईंच्याच प्रेरणेने महिलांमध्ये शैक्षणिक क्रांती
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सावित्रीबाई फुले यांचे महिलांसाठीचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. त्यांच्याच प्रेरणेने भारतातील महिलांमध्ये शैक्षणिक क्रांती झाल्याची भावना न्यायमूर्ती किशोर रोही यांनी व्यक्त केली.
दीनबंधू सेवा संस्था आणि मित्र परिवाराच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पर्वावर लहान मुलांकरिता डॉ. अनुपमा उजगरे लिखित ‘ज्योतिबा : एक महात्मा’ या मराठी व इंग्रजी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन न्यायमूर्ती किशोर रोही व औद्योगिक आयुक्त हर्षदीप कांबळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी रोही बोलत होते.
समाजाने आरोपी केलेल्या महिलेची मृत्युदंडातून सुटका करणारे येशुख्रिस्त हे जगातील पहिले वकील होत. ज्याने कुणी आपल्या जीवनात कधीही पाप केले नाही, त्याने पहिला दगड त्या स्त्रीला मारावा, असा प्रतिवाद त्यांनी केला होता आणि गर्दीला पांगवल्याचे किशोर रोही यावेळी म्हणाले.
सावित्रीबाई फुले यांनीच स्त्री शिक्षणाचा राजमार्ग खुला केल्याची भावना डॉ. हर्षदीप कांबळे यावेळी म्हणाले. याप्रसंगी माजी मंत्री अनिस अहमद, किशोर गजभिये, नागेश चौधरी, सुधाकर गायधनी, प्रभाकर पावडे, गिरीश पांडव, किशोर कन्हेरे, ज्ञानेश्वर गोरे, ज्ञानेश्वर रक्षक उपस्थित होते.