लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर विनाचौकशी अटकसत्र सुरू असल्याच्या निषेधार्थ आज शुक्रवारी संपूर्ण राज्यात शिक्षण विभागातील अधिकारी 'एक दिवसीय कामबंद आंदोलन' करीत आहेत. नागपूर येथून उगम पावलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
नागपूर जिल्हा परिषदेतील दोन शिक्षण अधिकाऱ्यांना अटक झाल्यानंतर संपूर्ण प्रशासनात खळबळ माजली. संबंधित अधिकाऱ्यांना अटक ही "चोर सोडून संन्याशाला फाशी" देण्यासारखी असल्याचे मत शिक्षणाधिकारी संघटनेने व्यक्त केले आहे.
संघटनेचे भ्रष्टाचाराला समर्थन आहे का ?शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात आर्थिक स्वरूपाचे गुन्हे करण्यात आले आहे. विधिमंडळात हा मुद्दा उपस्थित झाला. त्यानंतर चौकशीसाठी एसआयटी गठित करण्यात आली. तपासात आर्थिक घोटाळा आढळून आल्याने पोलिसांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून अटक केली आहे. सकृतदर्शनी घोटाळा झाल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी शिक्षणाधिकाऱ्यांसह इतरांना अटक केली. अशा परिस्थितीत विनाचौकशी अटक केल्याचे कारण पुढे करून आंदोलन करीत असल्याने महाराष्ट्र शिक्षण सेवा अधिकारी संघटनेचे भ्रष्टाचाराला समर्थन आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
'गुन्हेगार नव्हे, तर अधिकारी'महाराष्ट्र शिक्षण सेवा अधिकारी संघटनेचे अध्यक्ष शेषराव बडे, कार्याध्यक्ष रवींद्र वाणी, सरचिटणीस रारोज जगताप, कोषाध्यक्ष डॉ. ज्योती परिहार व कार्यालयीन सचिव समरजीत पाटील आदींनी संयुक्त निवेदनात म्हटले की, "राजपत्रित अधिकारी प्रामाणिकपणे शासनाचे काम करीत असून, कदाचित त्यांच्या कामात त्रुटी असू शकतात. मात्र, त्यावर विभागीय चौकशीचा पर्याय उपलब्ध आहे.
असा दिला संघटनेने इशाराविनाचौकशी अटक न करण्याची शासनाची लेखी हमी मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील. एसआयटी चौकशी पूर्ण होईपर्यंत शिक्षक, शिक्षकेतर वेतन देयकावर सह्या केल्या जाणार नाहीत. सुटीच्या दिवशी होणाऱ्या कामाचा ताण कमी करण्यात यावा. मागण्या मान्य न झाल्यास ८ ऑगस्टपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन करण्यात येईल.