‘सेंट्रल’ प्रणालीमुळे शिक्षणाचे नुकसान

By Admin | Updated: July 1, 2014 01:03 IST2014-07-01T01:03:24+5:302014-07-01T01:03:24+5:30

ज्येष्ठ अणु वैज्ञानिक व भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी शिक्षण व विज्ञान क्षेत्रासंबंधातील निरनिराळ्या बाबींवर आपले मत व्यक्त केले.

Education losses due to 'Central' system | ‘सेंट्रल’ प्रणालीमुळे शिक्षणाचे नुकसान

‘सेंट्रल’ प्रणालीमुळे शिक्षणाचे नुकसान

अनिल काकोडकर : तंत्रज्ञानाच्या दुष्परिणामांवर उपाययोजनांची गरज
नागपूर : ज्येष्ठ अणु वैज्ञानिक व भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी शिक्षण व विज्ञान क्षेत्रासंबंधातील निरनिराळ्या बाबींवर आपले मत व्यक्त केले. रायसोनी महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी ‘सेंट्रल’ प्रणालीपेक्षा समकक्ष समूहांच्या निर्मितीवर भर देण्यात यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उच्चशिक्षण संस्था असतानादेखील महाविद्यालयांमधील शैक्षणिक दर्जा का वाढताना दिसत नाही, यासंदर्भात त्यांना विचारणा करण्यात आली. जास्त प्रमाणात महाविद्यालये असताना ‘सेंट्रल’ प्रणालीद्वारे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळे महाविद्यालयांच्या दर्जावर परिणाम होतो व विद्यार्थ्यांना हवे तसे शिक्षण मिळत नाही. केवळ पदवी घेऊन उपयोग नाही तर विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्घेच्या युगात यश मिळविण्यासाठी तयार करायला हवे. त्यामुळेच ‘सेंट्रल’ प्रणालीऐवजी समकक्ष समूहांची स्थापना झाली पाहिजे. सुरुवातीला यात अनेक अडचणी येतील. परंतु कालांतराने सर्व सुरळीत होऊन शिक्षणाचा दर्जा नक्कीच उंचावेल. या प्रक्रियेला वेळ दिला पाहिजे, असे काकोडकर यांनी सांगितले. दिवसेंदिवस तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणावर बदल होत असून, सर्वांच्याच राहणीमानावर त्याचा फरक पडतो आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या फायद्यासोबतच दुष्परिणामांवर विचार करणे व उपाययोजना राबविण्याची गरज आहे, असे डॉ. काकोडकर म्हणाले. (प्रतिनिधी)
विज्ञानातून दूर होऊ शकते पाणीटंचाई
दरवर्षी राज्यातील असंख्य गावांत मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई आढळून येते. यंदादेखील पाऊस सरासरीहून कमी आल्यामुळे चिंता वाढली आहे. परंतु पाणीटंचाईवर विज्ञानातून मार्ग शोधल्या जाऊ शकतो. ‘आयसोटोप हायड्रोलॉजी’च्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यात ‘ग्राऊंडवॉटर’ची योजना यशस्वीपणे राबविण्यात आली होती. अशाच प्रकारच्या उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे मत डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. ‘बीएआरसी’ व निरनिराळ्या कृषी महाविद्यालयांच्या संशोधनातून निरनिराळ्याडाळी, तेलबिया यांच्या सुधारित जाती विकसित करण्यात यश आले आहे. विज्ञानाच्या शक्तीचे हे चांगले उदाहरण आहे, असेदेखील ते म्हणाले. अणुऊर्जेच्या बाबतीत देश सातत्याने प्रगती करीत असून, येणारा काळ हा भारताचाच असेल, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Education losses due to 'Central' system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.