Edible oil price erupts in Nagpur: poor during festivals, panchayat of common people, artificial scarcity | नागपुरात खाद्यतेल भडकले  : सणांमध्ये गरीब, सामान्यांची पंचाईत, कृत्रिम टंचाई

नागपुरात खाद्यतेल भडकले  : सणांमध्ये गरीब, सामान्यांची पंचाईत, कृत्रिम टंचाई

ठळक मुद्देदहा दिवसात शेंगदाणा १५, सोयाबीन १० रुपये वाढ

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : डाळी, धान्य आणि अन्य वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यानंतर आता स्वयंपाकघरात आवश्यक खाद्यतेलाचे दर कृत्रिम टंचाईमुळे आकाशाला भिडले आहेत. एकीकडे उत्पन्न कमी होत आहे, तर दुसरीकडे वाढत्या महागाईने गरीब आणि सामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. महागाईवर नियंत्रण आणण्याची मागणी ग्राहक संधटना आणि ग्राहकांनी केली आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खाद्यतेलाचे दर आकाशाला भिडले असून दहा दिवसात सोयाबीन ८ ते १० रुपये तर शेंगदाणा तेलाचे दर प्रति किलो १२ ते १५ रुपयांनी वाढले आहेत. एक महिन्यात सोयाबीन किलोमागे १६ रुपयांनी महागले आहे. सर्वच खाद्यतेलाचे दर ८ ते २० रुपयांनी वधारले आहेत. दिवाळीच्या तोंडावर व्यापाऱ्यांनी खाद्यतेलाची कृत्रिम दरवाढ केली असून साठेबाजी करणाऱ्यांवर धाडी टाकण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.

बाजारात फिनिश आणि कच्च्या मालाचा पुरेसा साठा असताना व्यापाऱ्यांनी साठेबाजी करून दरवाढ केल्याचे दिसून येत असल्याचे किरकोळ व्यापाऱ्यांचे मत आहे. महागाईचे खापर केवळ किरकोळ व्यापाऱ्यांवर फोडले जाते. पण मूळ ठोक विक्रेत्यांवर कारवाई वा आरोपही होत नाही. अन्न पुरवठा विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केल्यास खाद्यतेलाचे दर कमी होतील, असे मत नागपूर किरकोळ व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केले.

राणी सती एन्टरप्राईजेसचे संचालक अनिल अग्रवाल म्हणाले, सोयाबीन आणि शेंगदाणा कच्च्या मालाचा पुरवठा कमी असल्याने भाववाढ झाली आहे. यावर्षी मुसळधार पावसामुळे पीक खराब झाले आहे, शिवाय उत्पादन कमी येण्याचा अंदाज कृषितज्ज्ञांनी वर्तविल्यानंतर मिल मालकांपासून ठोक व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांनीच खाद्यतेलाचे दर वाढविले आहेत. याशिवाय कोरोना काळात चार महिन्यात आयात बंद होती. अग्रवाल म्हणाले, नागपूर जिल्ह्यात ८० टक्के सोयाबीन तेलाची विक्री होते. महिन्यापूर्वी ९६ रुपये किलो दर होते. त्यानंतर दरवाढ होऊन १०२ ते १०४ रुपयांवर पोहोचले. दहा दिवसांपासून दररोज दरवाढ होत असून गुरुवारी ११० ते ११२ रुपये भाव होते. याशिवाय दहा दिवसांपूर्वीच्या १४५ रुपयांच्या तुलनेत गुरुवारी शेंगदाणा तेलाचे दर १६० रुपयांवर पोहोचले. सनफ्लॉवर तेलाचे दर २० रुपयांनी महाग होऊन १३२ रुपयांवर गेले आहेत. दिवाळीपर्यंत भाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

खाद्यतेल (प्र.कि. रु.) दहा दिवसांपूर्वी          २९ ऑक्टोबर

सोयाबीन                     १०२                              ११२

शेंगदाणा                     १४५                             १६०

सनफ्लॉवर                  ११२                               १३२

राईस                         ११४                                १२४

जवस                         ११८                               १२४

सरसो                        १२३                               १३०

पाम                           ९६                                १०४

खोबरेल                  २०८                                 २२०

Web Title: Edible oil price erupts in Nagpur: poor during festivals, panchayat of common people, artificial scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.