सामूहिक तबला वादनाने पकडली धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:08 IST2021-02-08T04:08:39+5:302021-02-08T04:08:39+5:30
- ताल अर्पण, स्त्री निनाद : पं. प्रभाकर देसाई स्मृती ‘संगीत प्रभाकर ताल उत्सव’ लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ...

सामूहिक तबला वादनाने पकडली धार
- ताल अर्पण, स्त्री निनाद : पं. प्रभाकर देसाई स्मृती ‘संगीत प्रभाकर ताल उत्सव’
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना टाळेबंदीमुळे दीर्घकाळानंतर पुन्हा एकदा रंगमंच बहरायला लागला आहे. तब्बल दहा महिन्यानंतर संगीताचा जाहिर कार्यक्रम अनुभवताना रसिकांची मने तृप्त झाली. प्रसंग होता ‘संगीत प्रभाकर : ताल उत्सवा’चा. या उत्सवात महिला सामूहिक तबला वादन झाले. तबल्यावर पडणाऱ्या एकसाथ थापा आणि त्यातून उमटणारे ताल मंत्रमुग्ध करणारे होते.
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र व ताल साधना समूह संस्थेच्या वतीने सायंटिफिक सभागृहात प्रसिद्ध तबला गुरू स्व. पं. प्रभाकर देसाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘संगीत प्रभाकर : ताल उत्सवा’चे आयोजन झाले. कार्यक्रमाची सुरुवात ‘ताल अर्पण, स्त्री निनाद’ने झाली. यात महिलांचे सामूहिक तबला वादन झाले. त्रितालमध्ये पेशकार, कायदे, रेला, धिर धिर, तुकडे, चक्रधर आदींची बहारदार प्रस्तूती आकांक्षा भेंडे, ऐश्वर्या महाडिक, बागेश्री कनाके व मुक्ता खिरवडकर-वाघ यांनी दिली. त्यांना गायन व लहरावर श्रुती पांडवकर यांनी संगत केली. श्रुती पांडवकर यांनी रागे रागेश्रीमध्ये बंदीश ताल त्रितालचे सादरीकरण केले. संवादिनीवर श्रीकांत पिसे तर तबल्यावर आकांक्षा भेंडे यांनी संगत केली. तद्नंतर कोलकाता येथील युवा तबला वादक अनुभ्रता चटर्जी यांचे एकल तबलावादन झाले. त्यांना लहरावर गोविंद गडीकर यांनी संगत केली.
* फोटो ओळी :- ‘संगीत प्रभाकर : ताल उत्सवा’त रविवारी महिला शिष्यार्थींचे सामूहिक तबला वादन झाले.
..........