ईडीने ताब्यात घेतला नागपुरातील इम्प्रेस मॉल; ‘पीएमएलए’नुसार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 22:44 IST2021-11-10T22:43:32+5:302021-11-10T22:44:03+5:30
Nagpur News ७२५ कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याच्या प्रकरणात ईडीने बुधवारी गांधी तलाव येथील इम्प्रेस मॉल आपल्या ताब्यात घेतला आहे.

ईडीने ताब्यात घेतला नागपुरातील इम्प्रेस मॉल; ‘पीएमएलए’नुसार कारवाई
जगदिश जोशी
नागपूर : ७२५ कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याच्या प्रकरणात ईडीने बुधवारी गांधी तलाव येथील इम्प्रेस मॉल आपल्या ताब्यात घेतला आहे. ईडीद्वारा प्रीव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग ॲक्ट (पीएमएलए) नुसार जवळपास ५०० कोटी रुपये किमतीची संपत्ती ताब्यात घेण्याची शहरातील ही पहिली कारवाई आहे. ईडीद्वारा आगामी काही दिवसात अशी कारवाई होणार असल्याची माहिती आहे.
एम्प्रेस मॉलची मालकी मुंबईच्या केएसएल इंडस्ट्रीजची आहे. केएसएल इंडस्ट्रीजचे प्रमुख प्रवीणकुमार तायल आहेत. सूत्रांनुसार केएसएल इंडस्ट्रीजने २०१५ मध्ये बँक ऑफ इंडिया आणि आंध्रा बँकेकडून ५२५ कोटी तसेच यूको बँकेकडून २०० कोटींचे कर्ज घेतले होते. या रकमेला शेल कंपन्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या खात्यात डायव्हर्ट केले होते. २०१६ मध्ये हा घोटाळा समोर आल्यानंतर ईडीने केएसएल इंडस्ट्रीजविरुद्ध पीएमएलएनुसार गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास ईडीची कोलकाता शाखा करीत आहे.
ईडीने तायल समूहाशी निगडित शेल कंपन्यांवर धाडी टाकून मोठ्या प्रमाणात कागदपत्र जप्त केले होते. ईडीने ८ मे २०१९ रोजी एम्प्रेस मॉलला अटॅच केले होते. एम्प्रेस मॉल २.७०.३७४ चौरस फुटात पसरला आहे. त्याची किंमत जवळपास ५०० कोटी रुपये आहे. एम्प्रेस मॉलसोबत ईडीने मुंबई येथील जवळपास २२५ कोटीची संपत्तीही अटॅच केली होती. ईडीच्या अटॅचमेंटच्या आदेशाला केएसएल इंडस्ट्रीजने आव्हान दिले आहे. त्यामुळे मॉलवर ताबा घेण्याची प्रक्रिया अडकली आहे.
केएसएल इंडस्ट्रीजचे आव्हान रद्द केल्यानंतर बुधवारी दुपारी ईडीच्या अधिकाऱ्यांचे पथक एम्प्रेस मॉलमध्ये पोहोचले. त्यांनी कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून मॉल ताब्यात घेतला. मॉलमध्ये प्रख्यात कंपन्यांचे आऊटलेट आणि रेस्टॉरंट आहेत. त्यांना किरायाने दिले आहे. अटॅचमेंटची प्रक्रिया झाल्यानंतर ते ईडीला किराया देणार आहेत.
..............