‘ब्रिकेट’पासून ‘इको-फ्रेंडली’ अंत्यसंस्कार
By Admin | Updated: November 24, 2015 05:57 IST2015-11-24T05:57:05+5:302015-11-24T05:57:05+5:30
अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडांमुळे पर्यावरणाची हानी होते. हीच बाब लक्षात घेऊन प्रदूषणाची पातळी कमी व्हावी

‘ब्रिकेट’पासून ‘इको-फ्रेंडली’ अंत्यसंस्कार
योगेश पांडे ल्ल नागपूर
अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडांमुळे पर्यावरणाची हानी होते. हीच बाब लक्षात घेऊन प्रदूषणाची पातळी कमी व्हावी यासाठी शेतातील काडीकचऱ्यापासून तयार होणाऱ्या ‘ब्रिकेट’ आणि गोवरी यांचा वापर करून नागपुरात ‘इको-फ्रेंडली’ अंत्यसंस्काराचा प्रयोग राबविण्यात आला. विशेष म्हणजे देशातील हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा ‘इको फ्रेंडली लिव्हिंग फाऊंडेशन’ या संस्थेतर्फे करण्यात आला आहे.
शहरातील विविध स्मशानघाटांवर अंत्यसंस्कारांसाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. ‘एका पार्थिवासाठी किमान एक वृक्ष’ असे समीकरण आहे. हेच वृक्ष वाढविताना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. लाकडांनीच अंत्यसंस्कार व्हावेत, असे बंधन कुठल्याही धर्मात नसल्याचा दावा करीत नागपुरातील ‘इको फ्रेंडली लिव्हिंग फाऊंडेशन’ने पुढाकार घेतला. यातूनच गोवरीच्या माध्यमातून ‘हरीत दहन’ ही संकल्पना समोर आली. २०१४ मध्ये ‘गॅस’ तसेच गोवरीच्या माध्यमातून अंत्यसंस्काराला सुरुवात झाली. २०१४ साली सुमारे २०० मृतदेहांचे या प्रणालीने अंत्यसंस्कार झाले व यामुळे सुमारे ४५० झाडांना जीवदान मिळाले.
आता गोवरी दहनाच्या समोर जाऊन संस्थेने ‘अॅग्रो वेस्ट’पासून तयार होणाऱ्या ‘ब्रिकेट’चादेखील अंत्यसंस्कारांसाठी वापर करण्याचा प्रयोग सुरू केला आहे. ‘ब्रिकेट’ हे सोयाबीन, कापूस, तूरसारख्या पिकांच्या कापणीनंतर शेतात उरलेल्या कचऱ्यापासून बनविले जाते. ‘ब्रिकेट’ बाजारात सहजतेने उपलब्ध असून याचा उपयोग उद्योगक्षेत्रात करण्यात येतो.
रविवारी नागपुरातील सहकारनगर घाटावर शशिकला भीष्म यांचा अंत्यसंस्कार याप्रकारे करण्यात आला. ‘ब्रिकेट’ची ‘जीसीव्ही’ (ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू) लाकडाइतकीच असल्यामुळे तितकीच उष्णता निर्माण होते. त्यामुळे अंत्यसंस्कारादरम्यान कुठलीही समस्या जाणवली नाही अशी माहिती संस्थेतर्फे देण्यात आली.
‘ब्रिकेट’चे फायदे
४प्रदूषणात घट
४अंत्यसंस्कारासाठी कमी खर्च
४झाडांची वाचणारी कत्तल
४अतिरिक्त इंधनाची आवश्यकता नाही
४ग्रामीण भागातील महिलांसाठी रोजगारनिर्मिती