Eclipse of ‘Starvalue’ to ‘Creativity’ on OTT platform too! | ओटीटी प्लॅटफॉर्मवरही ‘क्रिएटिव्हीटी’ला ‘स्टारव्हॅल्यू’चे ग्रहण!

ओटीटी प्लॅटफॉर्मवरही ‘क्रिएटिव्हीटी’ला ‘स्टारव्हॅल्यू’चे ग्रहण!

प्रवीण खापरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाने सिनेमा क्षेत्राला प्रचंड हादरा दिला आणि कधी स्वप्नातही विचार करू नये अशा प्रकारे देशातीलच नव्हे तर जगभरातील सिनेमागृह अनिश्चित काळासाठी बंद पडली आहेत. त्यामुळे, स्वाभाविकच अन्य पर्यायाचा विचार होणे अपेक्षित आहे. त्यातूनच निर्मात्यांकडून अतिशय तुसड्या नजरेने बघितल्या जाणाऱ्या ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’कडे हाच वर्ग आशेने बघतो आहे. त्यामुळे, अनेक मोठे सिनेमे याच प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहेत. मात्र, याचा फटका क्रिएटिव्ह वर्क करणाऱ्या छोट्या फिल्ममेकर्सला बसण्याची शक्यता आहे. एका अर्थाने ओटीटी प्लॅटफॉर्मवरही ‘क्रिएटिव्हीटी’ला ‘स्टारव्हॅल्यू’चे ग्रहण लागण्याची भीती निर्माण झाली आहे.

‘ओव्हर दी टॉप सर्व्हिसेस (ओटीटी)’ प्लॅटफॉर्मवर वेबसिरीज बघण्याचे चलन मोठ्या प्रमाणात वाढीस लागले आहे. ही लोकप्रियता बघता आणि कोरोनामुळे लागू झालेल्या टाळेबंदीमुळे अनिश्चित काळासाठी बंद पडलेल्या सिनेमागृहांमुळे बडे सिनेमा निर्माते आणि स्टारपॉवर इकडे वळू बघत आहेत. मोठा मासा लहान माशांना गिळतो, हाच नियम सर्वच क्षेत्रात लागू असल्याने आतापर्यंत लहान निर्मात्यांसाठी हक्काचे असलेले हे प्लॅटफॉर्म त्यांच्या हातून निसटण्याची भीती निर्माण झाली आहे. सिनेमागृहात रिलीज होत नसेल तर आपल्या क्रिएटिव्हीटी वेबसिरीजच्या ढाच्यात परिवर्तित करून ओटीटीला प्राधान्य देणाऱ्या छोट्या निर्माते व फिल्मेकर्सचे धाबे दणाणले आहे. कमी बजेट, सर्वसामान्य गुणी कलावंत आणि क्वॉलिटीवर भर देणाऱ्या या फिल्ममेकर्सला मोठ्या निर्माते व स्टारपॉवरच्या वादळात कसे टिकता येईल, ही चिंता सतावत आहे. स्पर्धा आपल्यासारख्यांशी नाही तर ज्यांच्याकडे प्रचंड पैसा व स्टारपॉवर आहे, अशांशी करायची असल्याने गुणी निर्माते व दिग्दर्शकांसाठी आता हाही मार्ग सोपा राहिलेला नाही.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने केलेल्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील गटबाजी चव्हाट्यावर यायला लागली आहे. मोठे स्टार आणि निर्माते वितरकांना हाताशी धरून देशभरातील थिएटर्स, मल्टिप्लेक्सवर एकाधिकार गाजवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा वाईट अनुभव नागपुरात चित्रपट निर्माते व प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनाही आलेला आहे. ओटीटीवर स्टारपॉवरचे प्रस्थ वाढल्यास थिएटरमधील गटबाजी इथेही सुरू होईल आणि कुणाचे चित्रपट रिलीज होऊ द्यायचे आणि कुणाचे नाही, याचे नियंत्रणही याच मोठ्या वर्गाकडे जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

स्टारला बघून पैसा मिळतो, आम्हाला नाही - अनुराग कुळकर्णी
माझ्या दोन्ही मोठ्या चित्रपटांना इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये चांगले यश मिळाले असले तरी इकडील गटबाजीने ते थिएटर्समध्ये रिलीज होऊ शकले नाही. त्यामुळे, साहजिकच ओटीटीवर रिलीज करण्याचा विचार आम्ही करतो आहोत. मात्र, इथेही खेमेबाजी चालते. ओटीटीवर मोठी व्ह्युअर्सशिप व सबस्क्रिप्शन असलेल्या कंपन्या स्टार्सना मोठा पैसा देऊन त्यांचे चित्रपट विकत घेतात. मात्र, आम्हाला देतीलही तर खूपच कमी किंवा जेवढे व्ह्युअर्स मिळतील तेवढा पैसा, अशी अट असल्याचे चित्रपट निर्माते व दिग्दर्शक अनुराग कुळकर्णी यांनी सांगितले.


स्टारपॉवरचा फटका गुणवंतांना बसू नये - सलिम शेख
ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांनी सर्वसामान्यांसारखे दिसणाऱ्या कलावंतांना मोठे काम दिले. या प्लॅटफॉर्मवर कन्टेन्ट महत्त्वाचा असल्याने, मोठ्या प्रमाणात प्रेक्षकवर्गही निर्माण झाला. लोकप्रियता बघता मोठे निर्मातेही इकडे वळायला लागले आहेत. हे चांगले संकेत म्हणता येतील. मात्र, स्टारपॉवरचा फटका गुणवान कलावंतांना बसू नये, हीच माफक अपेक्षा असल्याची भावना चित्रपट दिग्दर्शक सलिम शेख यांनी व्यक्त केली.

 

Web Title: Eclipse of ‘Starvalue’ to ‘Creativity’ on OTT platform too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.