पूर्वमध्ये चतुर्वेदींना स्पर्धा मध्यमध्ये दावेदारांची रांग
By Admin | Updated: July 15, 2014 01:18 IST2014-07-15T01:18:02+5:302014-07-15T01:18:02+5:30
उमेदवार निवडीबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी अ.भा. काँग्रेस समितीने पाठविलेल्या निरीक्षकांसमोर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उघडपणे गटबाजीचे प्रदर्शन केले.

पूर्वमध्ये चतुर्वेदींना स्पर्धा मध्यमध्ये दावेदारांची रांग
गटबाजीची रंगीत तालीम : सहाही विधानसभा आटोपल्या
नागपूर : उमेदवार निवडीबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी अ.भा. काँग्रेस समितीने पाठविलेल्या निरीक्षकांसमोर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उघडपणे गटबाजीचे प्रदर्शन केले. पूर्व नागपुरात पदाधिकाऱ्यांच्या एका गटाने माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध केला. मध्य नागपुरात माजी मंत्री अनिस अहमद यांना सेटल करण्यासाठी कार्यकर्त्यांनी निरीक्षकांना साकडे घातले. तर हलबा समाजाला येथे संधी द्या, असाही आग्रह काहींनी धरला. दोन्ही मतदारसंघात दावेदारांची मोठी रांग पाहायला मिळाली.
अ.भा. काँग्रेस समितीचे निरीक्षक विनोद चतुर्वेदी, जेसा मोटवानी यांनी देवडिया भवनात पूर्व व मध्य नागपुरातील पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. नगरसेवक दीपक कापसे, कुमुदिनी कैकाडे, लोणारे, पुरुषोत्तम हजारे, शेवंता तेलंग, ब्लॉक अध्यक्ष आदींनी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. चतुर्वेदींकडे कार्यकर्त्यांची फौज आहे. त्यांनाच संधी द्या, या संबंधीचे लेखी पत्रही निरीक्षकांना दिले. प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी तानाजी वनवे यांच्यासह रमण पैगवार, नगरसेविका मालुताई वनवे, गणेश शाहू, शोभा मेश्राम, राजू झाडे, धनराज मुळे, महिला काँग्रेसच्या निशा दांडेकर, बेबीनंदा गाडेकर, अॅड. प्रशांत खोब्रागडे, तुघलक अंसारी, माथाडी संघटनेते रोशन अंसारी, मिलिंद शेंडे, बाबुराव वंजारी, रत्नाकर जयपूरकर आदींनी चतुर्वेदी यांच्या नावाला विरोध केला. तानाजी वनवे यांनी स्वत:चा दावा केला. महापालिकेत काँग्रेसचे उमेदवार पाडण्यात मोठा वाटा आहे, अशी तक्रार शाहू व पैगवार यांनी केली. काँग्रेसचे नवे लोक काम करीत आहेत. या वेळी त्यांच्यापैकी कुणाला तरी संधी द्यावी, अन्यथा पक्ष अडचणीत येईल. येथे जागा जिंकायची असेल तर ओबीसी चेहरा द्या, अशी मागणी करण्यात आली. माजी महापौर नरेश गावंडे यांनी महापौर म्हणून केलेल्या कामाचा लेखाजोखा सादर करीत उमेदवारी देण्याची मागणी केली. याशिवाय अभिजित वंजारी, उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष व शहर सरचिटणीस उमाकांत अग्निहोत्री, युवक काँग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळके यांनीही उमेदवारीसाठी दावा केला.
मध्य नागपुरात माजी मंत्री अनिस अहमद यांच्यासाठी सरचिटणीस अतुल कोटेचा, ब्लॉक पदाधिकारी, माजी नगरसेवक भुत्तो, निजाम अली, ओवेस कादरी आदींनी निरीक्षकांना गळ घातली. प्रदेश सचिव जयप्रकाश गुप्ता यांनीही दावा केला. कमलेश समर्थ, जयप्रकाश पारेख, रामदास पराते, ब्रिजभूषण शुक्ला आदींनी त्यांना पाठबळ दिले. शेख हुसैन व आसीफ कुरेशी हे मुस्लीम समाजाचे वेगवेगळे शिष्टमंडळ घेऊन आले व स्वत:साठी उमेदवारी मागितली. महिला अध्यक्ष आभा पांडे, कांता पराते यांनीही दावा केला. शहर काँग्रेसचे सरचिटणीस विजय पखाले यांच्याासाठी गणपती शाहीद, पुष्पा पवनीकर, अश्वीन अंजीकर, जयमाला बारापात्रे यांनी उमेदवारीची मागणी केली. (प्रतिनिधी)