पृथ्वीलाही ‘लॉकडाऊन’ची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 10:53 IST2020-06-17T10:46:52+5:302020-06-17T10:53:31+5:30
पृथ्वीचे तापमान वाढत आहे, याचा अर्थ पृथ्वी आजारी आहे आणि हा आजार दूर करण्यासाठी 'लॉकडाऊन'सारख्या उपचाराची नक्कीच गरज आहे. जलवायू परिवर्तनाचा अभ्यास करणारे वैज्ञानिक याबाबत गंभीर इशारा देत आहेत.

पृथ्वीलाही ‘लॉकडाऊन’ची गरज
निशांत वानखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तापमान आणि हवामान बदल याच घटकांवरून जलवायू परिवर्तनाचे आकलन करता येणार नाही. मात्र कोरोनासारखा कोणताही आजार आला की माणसाच्या शरीराचे तापमान वाढते त्याचप्रमाणे पृथ्वीचे तापमान वाढत आहे, याचा अर्थ पृथ्वी आजारी आहे आणि हा आजार दूर करण्यासाठी 'लॉकडाऊन'सारख्या उपचाराची नक्कीच गरज आहे. जलवायू परिवर्तनाचा अभ्यास करणारे वैज्ञानिक याबाबत गंभीर इशारा देत आहेत.
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थे(नीरी)च्या जलवायू परिवर्तन विभागाचे प्रमुख व प्रधान वैज्ञानिक डॉ. जे. एस. पांडे यांनी गेल्या काही वर्षांतील वातावरणात झालेले बदल अधोरेखित केले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात थोड्या अधिक फरकाने पण जून, जुलै व आॅगस्ट महिन्यात निर्धारित व नियमित स्वरूपात येतो. गेल्या वर्षी मात्र जून संपल्यावर पाऊस सुरू झाला आणि पुढे हिवाळ्यापर्यंत गेला आणि वर्षभर थोड्या थोड्या दिवसाने हजेरी लावली. तापमान २ ते ३ अंशाने वाढलेच आहे. हा वरवर दिसणारा फरक झाला. मात्र जलवायू परिवर्तनामुळे पृथ्वीवरील अनेक प्राणी आणि पक्षी नामशेष होण्याच्या स्थितीत पोहचले आहेत. एवढेच नाही तर काही वनस्पतीही नष्ट झाल्या आहेत. भविष्यात कदाचित या संकटामुळे काही वनस्पती बहरणार नाही. यामुळे जैवविविधतेवर अदृश्य असे परिणाम होत आहेत.
कार्बन सायकल व हायड्रोलॉजिकल सायकल (पाणी) हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. टाळेबंदीमुळे जलवायू परिवर्तनात मोठी आणि सकारात्मक घट झाली. यासाठी कोणते मोठे तंत्रज्ञान व खर्च करण्याची गरज पडली नाही. हेच नियोजन पुढे करणे गरजेचे आहे. औद्योगिकीकरण, ‘रेसिडेन्सियल अॅक्टिव्हिटी’ करताना पर्यावरणाला हानी होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल.
‘ग्रीन कव्हर’ वाढविणे व ‘कार्बन फूटप्रिंट’ कमी करणे काळाची गरज आहे. सर्वात मोठे म्हणजे शिक्षण आणि जनजागृती करणे अत्यावश्यक असल्याची भावना डॉ. पांडे यांनी व्यक्त केली.
सामूहिक शेतीची गरज
आज देशात ८० टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत आणि प्रत्येक शेतकरी आपल्या पिकांसाठी नियोजन न करता पाण्याचा अमर्याद वापर करतो. यामुळे भूजल पातळी घसरून ‘हायड्रोलॉजिकल फूटप्रिंट’वर परिणाम झाला. यासाठी एकतर सामूहिक शेती किंवा कुणाला किती पाणी द्यायचे याचे नियोजन व नियंत्रण ठेवणारी स्वतंत्र स्वायत्त संस्था निर्माण करण्याची गरज डॉ. पांडे यांनी व्यक्त केली.