नागपुरातील जरीपटका, सदरमध्ये ई-तिकिटांच्या रॅकेटचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:06 IST2018-10-26T00:03:19+5:302018-10-26T00:06:06+5:30
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने गुरुवारी बैरामजी टाऊन, सदर आणि जरीपटका परिसरात ई-तिकिटांच्या रॅकेटचा पर्दाफाश करून दोन आरोपींना ३० ई-तिकिटांसह ताब्यात घेतले आहे.

नागपुरातील जरीपटका, सदरमध्ये ई-तिकिटांच्या रॅकेटचा पर्दाफाश
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्यारेल्वे सुरक्षा दलाने गुरुवारी बैरामजी टाऊन, सदर आणि जरीपटका परिसरात ई-तिकिटांच्या रॅकेटचा पर्दाफाश करून दोन आरोपींना ३० ई-तिकिटांसह ताब्यात घेतले आहे.
दपूम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गणेश गरकल यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेने ही कारवाई केली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रेल्वे सुरक्षा दलाने बैरामजी टाऊन सदरच्या सागर ट्रेडर्सवर धाड टाकली. दरम्यान संचालक सागर मोहन हिंगोरानी अवैधरीत्या ई-तिकीट बनविताना आढळला. दुसरी कारवाई जनता चौक जरीपटका येथील कुलदीप इलेक्ट्रॉनिक्स अँड पारस ट्रेडर्सवर करण्यात आली. येथे ताराचंद नानवानी संगणकावर ई-तिकीट अवैधरीत्या काढताना आढळला. आरोपी सागर हिंगोरानी याच्याजवळून अवैधरीत्या काढलेल्या ५०,४८१ रुपये किमतीच्या १९ ई-तिकिटा, १ कॉम्प्युटर जप्त करण्यात आला. आरोपी ताराचंद नानवानी याच्याजवळून १८,६०० रुपयांच ई-तिकिट जप्त केल्या. याशिवाय १ मॉनिटर, १ सीपीयू, १ डोंगल, रोख १५५०, १ मोबाईल, सीमकार्ड, १ डायरी जप्त करण्यात आली. दोन्ही आरोपींना अटक करून मोतीबाग आरपीएफ ठाण्यात आणण्यात आले. दोघांविरुद्ध रेल्वे अॅक्ट १४३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत १ लाख ११ हजार १३० रुपये आहे. जरीपटका आणि सदर पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई उपनिरीक्षक उषा बिसेन, सहायक उपनिरीक्षक सुजाता थोरात, हेड कॉन्स्टेबल सतीश इंगळे, अरविंद टेंभुर्णीकर, राहुल सिंग, सागर सालोडकर, प्रदीप गाढवे यांनी पार पाडली.