रुग्णांना अन्नपुरवठा करण्यासाठी ई-रिक्षा येणार!

By Admin | Updated: December 10, 2014 00:42 IST2014-12-10T00:42:44+5:302014-12-10T00:42:44+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) पाकगृहातील अन्न रुग्णापर्यंत पोहचतपर्यंत ते दूषित होत असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने प्रकाशित करताच मेडिकल प्रशासन खडबडून जागे झाले.

E-rickshaw to provide food to patients! | रुग्णांना अन्नपुरवठा करण्यासाठी ई-रिक्षा येणार!

रुग्णांना अन्नपुरवठा करण्यासाठी ई-रिक्षा येणार!

उघड्या अन्नाचा अस्वच्छ रिक्षातून प्रवास प्रकरण : रिक्षांची स्वच्छता व पेंटिंग सुरू
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) पाकगृहातील अन्न रुग्णापर्यंत पोहचतपर्यंत ते दूषित होत असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने प्रकाशित करताच मेडिकल प्रशासन खडबडून जागे झाले. वृत्ताची दखल घेत हातरिक्षाऐवजी ई-रिक्षातून अन्नपुरवठा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
रुग्णाला पौष्टिक आहार मिळाल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढून रुग्ण लवकर बरा होतो. या उद्देशानेच मेडिकलमध्ये पाकगृह निर्माण करण्यात आले. याच पाकगृहातून सध्याच्या स्थितीत मेडिकलसह सुपर स्पेशालिटी रुग्णालय व टीबी वॉर्डातील असे एकूण सुमारे ८०० रुग्णांना नाश्तासह दोन वेळेचे जेवण पुरविले जाते. यासाठी शासन दरमहा चार लाख रुपयांचे अनुदान देते. परंतु रुग्णांची संख्या पाहता हे अनुदान तटपुंजे आहे. यामुळे पौष्टिक आहार हा वरण-भात व जास्तीतजास्त वेळा भोपळ्याच्या भाजीपुराताच मर्यादित आहे. यातच १९८० पासून मांसाहार बंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांचा ‘समाधानकारक’ असा शेरा मिळाल्यावरच पाकगृहात तयार झालेला पदार्थ रुग्णांपर्यंत पोहचतो. परंतु या प्रवासात अन्न दूषित होत असल्याचे वास्तव समोर आले.
पाकगृहाकडे स्वत:च्या दोन हातरिक्षा आहेत. याच रिक्षातून मेडिकलच्या विविध वॉर्डात, सुपर स्पेशालिटी आणि क्षयरोगाच्या वॉर्डात अन्न पुरविले जाते. परंतु मोडकळीस आलेले हे रिक्षे आतून मळकट व अस्वच्छ आहेत. यातच अन्नाच्या भांड्यावरील झाकणे अर्धवट उघडी तर काहींवर झाकणच नसते. पोळ्या तर उघड्यावरच ठेवलेल्या असतात. याचे वृत्त प्रसिद्ध होताच मेडिकल प्रशासनाने या हातरिक्षा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रिक्षाऐवजी बॅटरीवर चालणाऱ्या ई-रिक्षांची मदत घेण्याचे ठरविले आहे. यासंदर्भाचा प्रस्ताव तयार करून वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग संचालनालयाकडे पाठविण्यात आला आहे. याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: E-rickshaw to provide food to patients!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.