‘ई-लायब्ररी’ आगीपासून बचावली!
By Admin | Updated: June 8, 2014 00:53 IST2014-06-08T00:53:06+5:302014-06-08T00:53:06+5:30
मेडिकलच्या ‘ई-लायब्ररी’च्या परिसरात असलेल्या बांबूच्या बुंध्याने अचानक पेट घेतला. सुदैवाने अग्निशमन विभागाच्या बंबाला पाचारण केल्याने कोट्यवधी रुपयांची ई-लायब्ररी थोडक्यात बचावली.

‘ई-लायब्ररी’ आगीपासून बचावली!
नागपूर : मेडिकलच्या ‘ई-लायब्ररी’च्या परिसरात असलेल्या बांबूच्या बुंध्याने अचानक पेट घेतला. सुदैवाने अग्निशमन विभागाच्या बंबाला पाचारण केल्याने कोट्यवधी रुपयांची ई-लायब्ररी थोडक्यात बचावली. ही घटना आज शनिवारी सकाळी ११.३0 वाजताच्या सुमारास घडली.
मेडिकल परिसरात सफाई करणार्या कर्मचार्यांनी शनिवारी झाडाच्या बुंध्याजवळ कचरा गोळा करीत तो पेटवून दिला. पाहता पाहता आगीचा भडका उडाला. बांबू आणि निलगिरीच्या झाडाने क्षणात पेट घेतला. आगीचा भडका उडताच अग्निशमन दलाला सूचना देण्यात आली.
अवघ्या १0 मिनिटांत बंब घटनास्थळी पोहचल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. ज्या ठिकाणी आगीचा भडका उडाला त्या झाडाच्या बुंध्याला लागूनच परिसरात विजेचा पुरवठा करणार्या वीजवाहक तारा आहेत. शिवाय अगदी काही फुटांवर एक डीपीदेखील आहे. विशेष म्हणजे ई- लायब्ररीच्या तळमजल्यावर स्पिरीटचे बंबही ठेवण्यात आले आहेत. मेडिकलच्या विविध वॉर्डांना लागणारे स्पिरीट येथून पुरविले जाते. आगीतून उडणार्या ठिणग्या जर लायब्ररीपर्यंत पोहचल्या असत्या तर या स्पिरीटचाही भडका उडाला असता. मात्र, आग वेळीच नियंत्रणात आल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. (प्रतिनिधी)