गावागावांत प्रचाराचा धुरळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:22 IST2021-01-08T04:22:17+5:302021-01-08T04:22:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर जिल्ह्यात १३० ग्रामपंचायतींपैकी कळमेश्वर तालुक्यातील सोनपूर (आदासा) आणि सावनेर तालुक्यातील जटामखोरा ग्रा.पं.ची निवडणूक ...

गावागावांत प्रचाराचा धुरळा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यात १३० ग्रामपंचायतींपैकी कळमेश्वर तालुक्यातील सोनपूर (आदासा) आणि सावनेर तालुक्यातील जटामखोरा ग्रा.पं.ची निवडणूक अविरोध झाली आहे. त्यामुळे येत्या १५ जानेवारीला १२८ ग्रा.पं.साठी निवडणूक होईल. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया संपल्यानंतर आता गावागावांत प्रचाराचा धुरळा उडाला आहे. गुलाबी थंडीत गावाच्या पारावर यावेळी कोण, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. जिल्ह्यात १२८ ग्रा.पं.च्या ४२६ वॉर्डांत ही निवडणूक होत आहे. यासाठी २७९८ उमेदवार रिंगणात आहेत.
ग्रा.पं.च्या निवडणुका एकसंध होऊन लढण्याचा संकल्प महाविकास आघाडीने केला आहे. महाविकास आघाडीत मात्र काही गावांत बिघाडी झाली आहे. महाविकास आघाडातील बिघाडी कॅश करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. इकडे मात्र नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक निकालाचा दाखला देत महाविकास आघाडीचे जिल्हा पातळीवरील नेते स्थानिक कार्यकर्त्यांना एकीचा मंत्र देत आहेत. ग्रा.पं.च्या निवडणुकीत स्थानिक मुद्द्यांना अधिक प्राधान्य असते. त्यामुळे नेत्यांचे ऐकायचे की गावाचा विकास करणाऱ्यांना प्राधान्य द्यायचे, असे प्रश्न गावातील तरुण मतदारांकडून विचारले जात आहेत.
जिल्ह्यात सर्वाधिक २५ ग्रा.पं.साठी कुही तालुक्यात निवडणुका होत आहेत. हा तालुका उमरेड विधानसभा क्षेत्रात मोडतो. येथे निवडणूक बिनविरोध करणाऱ्या ग्रा.पं.ला २५ लाख रुपयांचा विकास निधी देण्याचे आ. राजू पारवे यांनी जाहीर केले होते. मात्र, तालुक्यातील एकही ग्रा.पं. बिनविरोध होऊ शकली नाही. यावरून कुहीतील राजकीय पाऱ्याचा अंदाज येतो. यंदा होणारी कुही नगरपंचायत निवडणूक विचारात घेता येथे ग्रा.पं.च्या निवडणुका भाजप आणि काँग्रेसची परीक्षा घेणाऱ्या ठरणार आहेत.
नागपूर जिल्ह्यात सावनेर, उमरेड, पारशिवनी, रामटेक, नागपूर ग्रामीण या तालुक्यांतील निवडणुका अधिक अटीतटीच्या होतील, असे सध्याचे चित्र आहे. नागपूर ग्रामीण तालुक्यातील वाडी न. प.ची निवडणूक तोंडावर आहे. त्यामुळे या तालुक्यातील निवडणुकाही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपसाठी आव्हान असणार आहेत.
१५ जानेवारीला निवडणूक असल्याने १३ जानेवारीला ग्रा.पं.च्या प्रचार तोफा थंडावतील. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी ८ दिवसांचा कालावधी मिळणार आहे. यातच कोरोनाविषयक उपाययोजनांचे सर्वच उमेदवारांना पालन करायचे असल्याने गावातील प्रचारावर प्रशासनाची करडी नजर असणार आहे.
मोठ्या ग्रा.पं.कडे लक्ष
जिल्ह्यात निवडणूक होऊ घातलेल्या सर्वच मोठ्या ग्रा.पं.कडे सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. नागपूर ग्रामीण तालुक्यातील दवलामेटी ग्रा.पं.च्या १७ जागांसाठी ७८ उमेदवार रिंगणात आहेत. येथे काँग्रेस आणि भाजप समर्थित पॅनेलमध्ये लढत आहे. यासोबतच हिंगणा तालुक्यातील सातगाव वेणानगर येथील १५ जागांसाठी ५० उमेदवार रिंगणात आहेत. तसेच कामठी तालुक्यातील कोराडी येथे १७ जागांसाठी ४३ उमदेवार आपले नशीब आजमावत आहेत. नरखेड तालुक्यात खैरगाव ग्रा.पं.साठी ४१ उमेदवारांनी दंड थोपटले आहेत, तर रामटेक तालुक्यात पंचाळा (बु.) येथे ११ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात आहेत.