नागपूर : अधिक वेगाने पसरणारा कोरोनाचा नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये काही दिवसापूर्वीच आढळून आला. त्यानंतर कोरोनाचा आणखी एक स्ट्रेन आढळून आल्याने ब्रिटनमध्ये खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर कोरोना नवा विषाणू आढळून आलेल्या विदेशातून महिनाभरात नागपुरात १७० प्रवासी आले. यातील ५२ लोकांपर्यंत महानगरपालिकेचे वैद्यकीय पथक पोहचले असून, त्यांच्यातील ५ प्रवासी कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू असून, नव्या स्ट्रेनच्या चाचणीसाठी नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.
नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा ग्राफ घसरतो आहे. परंतु कोरोनाचा विषाणूमध्ये बदल झाल्याचे समोर आल्याने पुन्हा चिंता वाढली आहे. कोरोना विषाणूचे नवे रूप जास्त धोकादायक आणि संक्रामक असल्याचे म्हटले जाते. तज्ज्ञानुसार, प्रत्येक विषाणू हा स्वत:मध्ये बदल करीत असतो. त्याला ‘म्युटेशन’ असे म्हणतात. विषाणू ‘म्युटेट’ होऊन म्हणजेच स्वत:च्या संरचनेत काही बदल करून नवीन प्रकाराच्या विषाणूत रूपांतरित होतो. यालाच विषाणूचा नवा ‘स्ट्रेन’ म्हटले जाते. ऑस्ट्रेलिया आणि इतरही काही देशांमध्येही कोरोना विषाणूचे बदललेले स्वरूप आढळले आहे आणि अशा परिस्थितीत लोक एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करीत असल्याने खबरदारीचे उपाय योजले जात आहेत.
-प्रवाशांच्या तपासणीचे आव्हान
विषाणूच्या नवा स्ट्रेनमुळे विदेशातून नागपुरात येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीचे आव्हान पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे. यासाठी महानगरपालिकेने २५ नोव्हेंबरपासून ते २३ डिसेंबरदरम्यान युरोप, मिडल ईस्ट, साऊथ आफ्रिका येथून आलेल्या १७० प्रवाशांची यादी तयार केली आहे. यातील ५२ प्रवाशांपर्यंत मनपाचे आरोग्य पथक पोहचून त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली आहे. यातील ४७ प्रवासी निगेटिव्ह आले आहेत.
- बाधितांमधील एक आयर्लंड तर चार इंग्लंडमधून नागपुरात परतले
मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या पाच रुग्णांमध्ये एक आयर्लंड तर चार इंग्लंडमधून नागपुरात परतले आहेत. यातील दोन रुग्णांची दुसऱ्यांदा आरटीपीसीआर चाचणी केली असता अहवाल निगेटिव्ह आला आहे. परंतु खबरदारी म्हणून पाचही रुग्णांना मेडिकलच्या विशेष वॉर्डात दाखल केले आहे. यात दोन महिला व तीन पुरुष आहेत.
-विदेशातून आलेल्यांची संख्या १७०
- पॉझिटिव्ह निघालेले रुग्ण ५
कोट..
विदेशातून आलेल्या पाचही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. विषाणूच्या नवा स्ट्रेनची चाचणी करण्यासाठी पुण्याच्या ‘एनआयव्ही’ प्रयोगशाळेत नमुने पाठविण्यात आले आहे. सात दिवसापर्यंत त्यांना हॉस्पिटलमध्ये राहावे लागणार आहे.
-डॉ. प्रशांत पाटील
प्रमुख, मेडिसीन विभाग, मेडिकल