नागपूर रेल्वेस्थानकावर वाहतूक पोलिसाच्या सतर्कतेमुळे गवसला चार तोळ्याचा हार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 13:29 IST2018-02-27T13:29:29+5:302018-02-27T13:29:36+5:30
नागपूर रेल्वे स्थानकावर वाहतूक शाखेत काम करणाऱ्या भगवान इंगोले याने रेल्वेस्थानकाच्या परिसरात सापडलेला चार तोळ्यांचा सोन्याचा हार परत करून इमानदारीचा परिचय दिला आहे.

नागपूर रेल्वेस्थानकावर वाहतूक पोलिसाच्या सतर्कतेमुळे गवसला चार तोळ्याचा हार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्त्यावर शंभर रुपयाची नोट पडली तरी ती कुणाची आहे याचा शोध घेण्याची कुणी तसदी घेत नाही. परंतु नागपूर रेल्वे स्थानकावर वाहतूक शाखेत काम करणाऱ्या भगवान इंगोले याने रेल्वेस्थानकाच्या परिसरात सापडलेला चार तोळ्यांचा सोन्याचा हार परत करून इमानदारीचा परिचय दिला आहे.
परमित कौर गुरप्रीत सिंग (३०) रा. पंजाबी लाईन, कामठी रोड यांचे दोन दिवसांपूर्वी लग्न झाले. रविवारी त्यांचे नातेवाईक तेलंगणा एक्स्प्रेसने जात असल्यामुळे त्यांना निरोप देण्यासाठी परमित कौर कुटुंबीयांसह नागपूर रेल्वेस्थानकावर आल्या होत्या. धावपळीत त्यांच्या गळ्यातील चार तोळ्याचा सोन्याचा हार खाली पडला. ड्युटीवर असलेले वाहतूक पोलीस भगवान इंगोले यांचे लक्ष त्या हाराकडे गेले. त्यांनी तो हार उचलून आपल्या सहकाऱ्यांना त्याबाबत माहिती दिली. नातेवाईकांना निरोप देऊन झाल्यावर घरी निघत असताना परमित कौर यांना गळ्यातील हार हरविल्याचे समजले. लगेच त्यांनी लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून याबाबत माहिती दिली. त्यावर रवींद्र सावजी, योगेश धुरडे यांनी मुख्य प्रवेशद्वारासमोर हाराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वाहतूक पोलीस भगवान इंगोले, प्रमोद घ्यारे यांनी त्यांना सोन्याचा हार सापडल्याची माहिती दिली. हरविलेला आणि त्यांना सापडलेला हार एकच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कागदोपत्री कारवाई करून तो हार परमित यांना सोपविण्यात आला. त्यांनी वाहतूक पोलीस भगवान इंगोले यांना मनापासून धन्यवाद दिले.