लठ्ठपणावरील नियंत्रणामुळे चार टक्क्यांनी मृत्यू दर कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 20:59 IST2018-02-12T20:57:32+5:302018-02-12T20:59:28+5:30
भारतात समृद्धी वाढत असतानाच लठ्ठ लोकांचे प्रमाणही वाढत असून ते हाताबाहेर चाललेले आहे. लठ्ठपणात भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. लठ्ठपणामुळे मधुमेहाचे वाढते प्रमाण चिंता व्यक्त करणारे आहे. दगावणाऱ्या प्रत्येक सहा जणांत एक मधुमेही आहे. मधुमेही लठ्ठ रुग्णांवर बेरियाट्रिक सर्जरी वरदान ठरत आहे.

लठ्ठपणावरील नियंत्रणामुळे चार टक्क्यांनी मृत्यू दर कमी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतात समृद्धी वाढत असतानाच लठ्ठ लोकांचे प्रमाणही वाढत असून ते हाताबाहेर चाललेले आहे. लठ्ठपणात भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. लठ्ठपणामुळे मधुमेहाचे वाढते प्रमाण चिंता व्यक्त करणारे आहे. दगावणाऱ्या प्रत्येक सहा जणांत एक मधुमेही आहे. मधुमेही लठ्ठ रुग्णांवर बेरियाट्रिक सर्जरी वरदान ठरत आहे. लठ्ठपणावर नियंत्रण मिळविल्यास मृत्यू दर चार टक्क्यांनी कमी करता येतो, अशी माहिती प्रसिद्ध बेरियाट्रिक सर्जन डॉ. मुफ्फझल लकडावाला यांनी येथे दिली.
अकॅडमी आॅफ मेडिकल सायन्सेस, डायबेटिक असोसिएशन आॅफ इंडिया व असोसिएशन आॅफ सर्जन्सच्या वतीने बेरियाट्रिक सर्जरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात ‘डॉ. वऱ्हाडपांडे स्मृती व्याख्यानमालेत’ ‘बॅरियाट्रिक सर्जरी काल, आज आणि उद्या’ या विषयावर ते बोलत होते. कार्यशाळेत डॉ. शेहला शेख यांनी ‘बेरियाट्रिक सर्जरीच्या पूर्वी व नंतरचे वैद्यकीय व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम, अकॅडमी आॅफ मेडिकल सायन्सचे सचिव डॉ. राजेश अटल, डायबेटिक असोसिएशनचे डॉ. प्रशांत जोशी, डॉ. संकेत पेंडसे, डॉ. प्रकाश खेतान, डॉ. राजेश सिंघवी, डॉ. उन्मेद चांडक, डॉ. सुशील लोहिया, डॉ. कन्हैया चांडक आदी उपस्थित होते.
डॉ. लकडावाला म्हणाले, ‘बेरियाट्रिक सर्जरी’ला लठ्ठपणाची शस्त्रक्रिया म्हणून पाहिले जाते. परंतु आता बेरियाट्रिक सर्जरीची पुढची पायरी म्हणून ‘मेटॅबोलिक सर्जरी’ची ओळख निर्माण झाली आहे. ही शस्त्रक्रिया मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान म्हणून सिद्ध झाली आहे. ‘टाईप-२’ मधुमेह होण्याच्या १५ वर्षांच्या आत जर ‘मेटॅबोलिक सर्जरी’ (चयापचयासंबधी शस्त्रक्रिया) केल्यास हा आजार बरा होऊ शकतो. इन्सुलिन, औषधे बंद केली जाऊ शकतात. लठ्ठपणासाठी आपली अयोग्य जीवनशैली आणि आहारशैली कारणीभूत आहे. लठ्ठपणा ही जागतिक समस्या बनली आहे. भारतात ३० दशलक्ष प्रौढ व्यक्ती, तर १४.४ दशलक्ष लहान मुले लठ्ठपणाने ग्रस्त आहेत. लहान मुलांच्या लठ्ठपणाच्या संख्येत भारताचा चीननंतर दुसरा क्रमांक लागतो.
महिलांमधील लठ्ठपणामुळे स्तनाचा, गर्भाशयाचा व इतर कर्करोगाची जोखीम साधारण २० टक्क्यांनी वाढते, तर पुरुषांमध्ये ९ टक्क्यांनी वाढते. यात प्रोस्टेट, फुफ्फुस, अन्ननलिका आणि पोटाचा कॅन्सर होण्याची भीती असते, अशी माहिती डॉ. लकडावाला यांनी दिली. ते म्हणाले, लठ्ठपणामुळे जडत असलेल्या इतर रोगांमुळे जगभरात दरवर्षी पाच दशलक्ष व्यक्तींचा मृत्यू होतो. शिवाय, लठ्ठपणा व मधुमेहामुळे ४० प्रकारचे कर्करोग होतात.
टीव्ही झाले स्लिम आपण झालो लठ्ठ
कधीकाळी घरातील टीव्ही प्रचंड लठ्ठ होता तो आता स्लिम झाला आहे. मात्र तासन्तास टीव्ही समोर बसून काहीनाकाही खाण्याची सवय वाढल्याने आपण मात्र लठ्ठ होत आहोत. बैठी जीवनशैली पद्धतीने मुले आळशी होत असून त्यांच्यात लठ्ठपणा वाढत आहे. परिणामी, ते अकाली मधुमेहाच्या विळख्यात सापडत आहे, असेही डॉ. लकडावाला म्हणाले.
डॉ. स्वप्नील देशपांडे यांना ‘यंग अचिव्हर्स अवॉर्ड’
वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५० वर्षाखालील युवा डॉक्टर स्वप्नील देशपांडे यांना कार्यशाळेत ‘यंग अचिव्हर्स अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. तर या वर्षीचा ‘प्रोफेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ सावंगी वर्धा येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयातील बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. अलोक घोष यांना प्रदान करण्यात आला.