नागपुरात मद्यधुंद पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 11:23 PM2019-08-06T23:23:03+5:302019-08-06T23:23:59+5:30

नशेत टुन्न असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे मंगळवारी शहर पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली. शांताराम मोजे असे या पोलीस कर्मचाºयाचे नाव असून, तो मुख्यालयात कार्यरत (मात्र, गैरहजर) असल्याचे समजते.

Drunk police video goes viral in Nagpur | नागपुरात मद्यधुंद पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

नागपुरात मद्यधुंद पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

Next
ठळक मुद्देदुचाकीवर निघाला अन् रस्त्यावर पडला : शहर पोलीस दलात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नशेत टुन्न असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे मंगळवारी शहर पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली. शांताराम मोजे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, तो मुख्यालयात कार्यरत (मात्र, गैरहजर) असल्याचे समजते.
मद्यधुंद मोजे अत्यंत वर्दळीच्या जरीपटका रिंगरोडने त्याच्या दुचाकीवरून जाण्याचा प्रयत्न करताना दिसतो. या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने त्याला धोका होण्याचे लक्षात आल्यामुळे एक तरुण त्याच्याकडे धावतो. त्याला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला सुरक्षित आणले जाते. नंतर मोटरसायकलवरून त्याचा तोल जातो आणि तो खाली पडतो. त्याला एवढी नशा झालेली असते की मोटरसायकल उचलण्याचे सोडा, तो स्वत:ही उठू शकत नाही. अक्षरश: घुसतच तो रस्त्याच्या कडेला जाऊन एका झाडाखाली बसतो. बाजूचे तरुण त्याला पाणी नेऊन देतात. त्याची दुचाकी रस्त्यावर पडल्याने वाहतूक काही वेळेसाठी विस्कळीत होते. नंतर ते तरुण त्याची दुचाकी बाजूला करतात अन् मद्यधुंद पोलिसाची विचारपूस करतात. तो मदत करणाऱ्या तरुणांना हात जोडून धन्यवाद देताना दिसतो. तर, व्हिडीओ बनविणारा तरुण ‘तुम्ही पोलीसवाले असे कराल तर सामान्य नागरिकांचे काय’, असा सवाल करताना ऐकू येते. हा व्हिडीओ सोमवारी रात्री काही पत्रकारांना मिळाला. मात्र त्याच्या नोकरीवर गदा येईल, असे लक्षात आल्यामुळे काहींनी त्याकडे दुर्लक्ष केले. व्हिडीओ बनविऱ्यांनी तो मंगळवारी दुपारी सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली. पोलीस कर्मचारी कोण, कुठे कार्यरत आहे, त्याबाबत सर्वजण विचारणा करीत होते. याप्रकरणी सायंकाळपर्यंत काही कारवाई झाली नसली तरी सविस्तर चौकशीनंतर बुधवारी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली जाऊ शकते, असे एका अधिकाऱ्याने लोकमतला सांगितले. हा व्हिडीओ २३ जुलैला बनविण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.

...तर धोका झाला असता
हा पोलीस कर्मचारी एवढा टुन्न होता की, त्याला वेळीच त्या तरुणाने मदतीचा हात देऊन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला येण्यास मदत केली नसती अन् तशा अवस्थेत मोटरसायकलची त्याने गती वाढविली असती तर अपघात होऊन मोठा धोका झाला असता, असे हा व्हिडीओ बघितल्यावर दिसते.

Web Title: Drunk police video goes viral in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.