उपचारापेक्षा औषधे महाग
By Admin | Updated: March 13, 2017 01:53 IST2017-03-13T01:53:59+5:302017-03-13T01:53:59+5:30
आरोग्य सेवेसाठी असलेल्या मेडिकल आणि मेयोमध्ये खरंच गरिबांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते काय,

उपचारापेक्षा औषधे महाग
सिटी स्कॅन, एमआरआयपूर्वी दिला जाणाऱ्या ‘डाय’चा तुटवडा : बीपीएलच्या रुग्णांनाही फटका
सुमेध वाघमारे नागपूर
आरोग्य सेवेसाठी असलेल्या मेडिकल आणि मेयोमध्ये खरंच गरिबांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते काय, हा प्रश्न आज निर्माण झाला आहे. प्रत्यक्ष उपचारापेक्षा त्यावरील औषधांचा खर्चच जास्त मोठे संकट असल्यासारखे प्रत्येकाला वाटत आहे. गरिबांचे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या मेयो, मेडिकलमध्ये सिटी स्कॅनचे शुल्क ४५० आहे. मात्र या तपासणी पूर्वी दिले जाणाऱ्या ‘डाय’चा तुटवडा पडल्याने दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) रुग्णांसह इतरही गरीब रुग्णांना बाजारातून हा ‘डाय’ ८०० ते १४०० रुपयांपर्यंत विकत घ्यावा लागत आहे. यासाठी अनेक रुग्णांवर पदरमोड करण्याची वेळ आली आहे.
शासकीय रुग्णालयांमध्ये एकीकडे अद्ययावत यंत्रणा व विविध विभाग उघडले जात असलेतरी गरीब रुग्णांच्या हक्काच्या सोयी उपलब्ध करून दिले जात नसल्याने आरोग्याची परिस्थिती बिकट होत चालली आहे.
विशेष म्हणजे, रुग्णांच्या सोयीसाठी या रुग्णालयांमध्ये सिटी स्कॅन व एमआरआयची सोय आहे. मात्र याच्या शुल्काच्या दुप्पट रक्कम चाचणीपूर्वी देण्यात येणाऱ्या ‘डाय’वर खर्च होत आहे. अचूक रोगनिदानासाठी विशिष्ट रसायनांचा हा ‘डाय’ देणे महत्त्वाचे ठरते. या रसायनांना ‘कॉन्ट्रास्ट एजंट’ असेही म्हणतात. या ‘डाय’मुळे आतील भागात निर्माण झालेली असाधारण स्थिती (रोगाच्या दृष्टीने) साधारण स्थितीपेक्षा वेगळी दिसण्यास उपयोग होतो. परंतु मेडिकल, मेयोमध्ये याचा तुटवडा पडला असून विशेषत: गंभीर आजाराच्या रुग्णांच्या नातेवाईकांना वेळेवर धावाधाव करावी लागत आहे. (प्रतिनिधी)
दोन महिन्यापासून ‘डाय’ नाही
मेडिकलमध्ये सिटी स्कॅन किंवा एमआरआय करणाऱ्या ‘बीपीएल’च्या रुग्णांना नि:शुल्क ‘डाय’ पुरविण्याचे नियम आहेत. परंतु नियमांना बगल देत ‘बीपीएल’सह सर्वच रुग्णांना बाहेरून ‘डाय’ खरेदी करण्यासाठी वेळेवर चिट्टी लिहून दिली जात आहे. विशेष म्हणजे, सिटी स्कॅनला लागणारी ‘डाय’ ही ८०० ते १४०० रुपयांमध्ये तर एमआरआयसाठी लागणारी ‘डाय’ ही १८०० रुपये किमतीला मिळते. अनेक गरीब रुग्णांना हा खर्चही झेपत नसल्याने ते अडचणीत आले आहेत.
आरसीवर पुरवठा नाही
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, हे ‘कॉन्ट्रास्ट एजंट’ दरकरारावर (आरसी) उपलब्ध नाही. यामुळे ‘कोटेशन’पद्धतीने खरेदी करावे लागते. परंतु याच्या मर्यादा आहेत. यामुळे अनेकवेळा स्थानिक खरेदीतून हे रसायन विकत घेतले जाते. त्यातही गरीब रुग्णांना हा ‘डाय’ न देता ओळखीच्या रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले जात असल्याची धक्कादायक माहिती आहे.