नागपुरात ड्रग सप्लायर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:08 IST2021-04-16T04:08:25+5:302021-04-16T04:08:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कुख्यात गुंड आणि ड्रग तस्कर अंकिश ऊर्फ गुलाम तुर्केल याच्यासाठी काम करणाऱ्या दोन ड्रग ...

नागपुरात ड्रग सप्लायर जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुख्यात गुंड आणि ड्रग तस्कर अंकिश ऊर्फ गुलाम तुर्केल याच्यासाठी काम करणाऱ्या दोन ड्रग सप्लायर्सना गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाने अटक केली. त्यांच्याकडून साडेपाच लाखांची एमडी तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले. बैद्यनाथ चाैकातील बसस्थानकाजवळ बुधवारी पोलिसांनी ही कारवाई केली.
साैरभ दादाराव छपाने (वय २२, रा. धम्मनगर, काटोल मार्ग, नागपूर) आणि संदीप मुचुकुंद पांडे (वय २१, रा. चिंतामणीनगर दुर्गा माता मंदिराजवळ भिवसनखोरी) अशी अटक करण्यात आलेल्या ड्रग सप्लायर्सची नावे आहेत.
पोलिसांच्या रेकाॅर्डवरील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार अंकिश तुर्केल हा गेल्या काही महिन्यांपासून एमडी तस्करीत चांगलाच सक्रिय झाला आहे. विज्ञान शाखेचा पदवीधर असलेला साैरभ आधी नागपुरात हुक्का पार्लर चालवायचा. येथे महाविद्यालयीन तरुण-तरुणींना एमडी पुरविताना त्यालाही एमडीची लत लागली. पोलिसांनी हुक्का पार्लरवर कारवाई केल्याने तो येथून पुण्याला पळून गेला आणि तेथे तो फोन पे कंपनीत काम करू लागला. मात्र, एमडीचे व्यसन भागविण्यासाठी पुरेशी रक्कम मिळत नसल्याने तो अस्वस्थ होता. अशात त्याला मुंबईच्या मंगेशची आणि तुर्केलसाठी ड्रग तस्करी करणाऱ्या संदीप पांडेची साथ मिळाली. तेव्हापासून साैरभ आणि संदीप मंगेशकडून मुंबईहून नियमित एमडीची खेप आणत होते. बुधवारी ते अशाच प्रकारे ५३.४८ ग्राम एमडी घेऊन नागपुरात आले. बैद्यनाथ चाैकातील ट्रॅव्हल्सच्या स्थानकापासून ते होंडा शाईन दुचाकीने एमडीची खेप पोहोचविण्यासाठी निघाले. मात्र, आधीच त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या एनडीपीएसच्या पथकाने त्यांना पकडले. साैरभ आणि संदीपची झडती घेतली असता त्यांच्याकडे पाच लाख, ३४ हजार रुपये किमतीची एमडी सापडली. ती तसेच मोटरसायकल आणि मोबाइल असा एकूण सहा लाख २० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. प्राथमिक चौकशीत त्यांनी ही खेप गुलाम तुर्केल (रा. फ्रेण्ड्स कॉलनी) याच्यासाठी आणल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांना अंमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली.
---
सूत्रधार तुर्केल आलाच नाही
तुर्केल बहुचर्चित आशी मिळून हा गोरखंदा करतात. साैरभ आणि संदीप बैद्यनाथ चौकातच तुर्केलला एमडीची डिलिव्हरी देणार होते.
मात्र, तुर्केलला शंका आली काय, कळायला मार्ग नाही. दुपारपासून सायंकाळपर्यंत वाट बघूनही तुर्केल तेथे आलाच नाही. त्यात हे दोघेही दुचाकीने निघून जाताना दिसल्याने अखेर पोलिसांनी त्यांना पकडले. तुर्केल फरार झाला. गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने, सहायक आयुक्त भीमानंद नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सार्थक नेहते, सहायक निरीक्षक सूरज सुरोशे, हवलदार नामदेव टेकाम, समाधान गिते, नायक विनोद गायकवाड, नितीन मिश्रा, कपिलकुमार तांडेकर, राहुल गुमगावकर, अश्विन मांगे, समीर शेख, नितीन साळुंखे आणि राहुल पाटील यांनी ही कामगिरी बजावली.
---