औषध तुटवड्यावर ‘जेनेरिक’चा डोज!

By Admin | Updated: May 22, 2015 02:56 IST2015-05-22T02:56:40+5:302015-05-22T02:56:40+5:30

आजघडीला प्रत्यक्ष आजारापेक्षा त्यावरचा उपचारच जास्त मोठे संकट असल्यासारखे प्रत्येकाला वाटते.

Drug Decline 'Generic' Dosage! | औषध तुटवड्यावर ‘जेनेरिक’चा डोज!

औषध तुटवड्यावर ‘जेनेरिक’चा डोज!

नागपूर : आजघडीला प्रत्यक्ष आजारापेक्षा त्यावरचा उपचारच जास्त मोठे संकट असल्यासारखे प्रत्येकाला वाटते. या वाढत्या महागाईच्या काळात अनेक नागरिक परवडत नाहीत म्हणून औषधे न घेताच रोग आणि आजार सहन करतात. यातच शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांच्या तुटवड्यामुळे सामान्य रुग्णांना औषध मिळेनासे झाल्याचे चित्र आहे. यावर उपाय म्हणून मेडिकलने जेनेरिक औषधांचा वापर करण्याचा विचार सुरू केला आहे. औषधांचे थकीत बिल आणि अधिष्ठात्यांचे साहित्य खरेदीचे अधिकार वाढविल्यास हे शक्य होणार आहे.
अन्न-वस्त्र-निवाऱ्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आरोग्याचा. वाढत्या महागाईच्या काळात अनेकांना खासगी डॉक्टरांचे शुल्कासह औषधांच्या किमती परडवत नाही, परिणामी शासकीय रुग्णालयाची वाट धरतात. परंतु येथेही अनेक औषधी बाहेरून घ्यावी लागत असल्याने रुग्ण अडचणीत येतो. यातच औषध पुरवठादारांची बिले थकल्यास औषधांचा तुटवडा आणखी बिकट होतो.
यावर उपाय म्हणून बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या सर्वच रुग्णांना औषध उपलब्ध करून देण्यासाठी मेडिकल प्रशासन जेनेरिक औषधांची मदत घेण्याच्या विचारात आहे. सध्या मेडिकलचे औषध पुरवठाधारकांचे १६ कोटींचे बिल थकीत आहे. ते मिळाल्यास आणि अधिष्ठात्यांना ५० लाखांपर्यंत साहित्य खरेदी करण्याचे अधिकार वाढविल्यास ही योजना सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, या योजनेमुळे रोजची दोन हजार रुग्णांची ओपीडी (बाह्य रुग्ण विभाग) वाढून चार हजार होण्याची शक्यता आहे.
जेनेरिक औषध गरिबांसाठी जणू प्राण वाचविणारी ‘संजीवनी’ ठरली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मदत व्हावी म्हणून जनमंचने नागपुरात पहिले जेनेरिक्स औषध उपलब्ध करून महत्त्वाची सेवा सुरू केली आहे. विशेष म्हणजे, नागपूर मेडिकल कॉलेजचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी ‘प्रिस्क्रिप्शन’ लिहून देताना जेनेरिक औषधे लिहनू द्यावी, असे फर्मान काढले होते, परंतु या योजनेचे पालनच झाले नाही. अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी आता ही योजना आणली आहे. ती किती यशस्वी होते, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Drug Decline 'Generic' Dosage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.