ड्रोनने फोटोग्राफी करणाऱ्याला दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:27 IST2020-12-15T04:27:13+5:302020-12-15T04:27:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : परवानगी न घेता ड्रोनने व्हिडिओग्राफी करणाऱ्याला पोलिसांनी दणका दिला. त्याचा दीड लाखाचा ड्रोन जप्त ...

ड्रोनने फोटोग्राफी करणाऱ्याला दणका
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : परवानगी न घेता ड्रोनने व्हिडिओग्राफी करणाऱ्याला पोलिसांनी दणका दिला. त्याचा दीड लाखाचा ड्रोन जप्त करण्यात आला. पंकज जयदेवजी भंडारकर (वय ३६) असे आरोपीचे नाव आहे. भंडारकर बिनाकी मंगळवारीतील पंजाबी गल्लीत राहतो. त्याने सदर, सिव्हिल लाईन्समध्ये एका लॉनमधील लग्नसमारंभाचे शनिवारी रात्री ९.४० च्या सुमारास छायाचित्रीकरण केले. बऱ्याच वेळेपासून सिव्हिल लाईन्समध्ये ड्रोन फिरत दिसल्याने पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर हा ड्रोन भंडारकर उडवत असल्याचे लक्षात आले.
ड्रोनच्या माध्यमातून छायाचित्रण करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालक, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तालयातून रीतसर परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे त्याला परवानगीबाबत विचारण्यात आली. त्याने कोणतीही परवानगी न घेता संवेदनशील भागात ड्रोनने छायाचित्रण केल्याचे स्पष्ट होताच दीड लाख किमतीचा ड्रोन आणि रिमोट जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त विनीता शाहू, सहायक आयुक्त रेखा भवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.
---