हक्काच्या घराचे स्वप्न अपूर्णच! प्रधानमंत्री आवास योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 17:53 IST2020-05-25T17:52:42+5:302020-05-25T17:53:06+5:30
देशातील प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे. यासाठी केंद्र सरकारतर्फेशहरी व ग्रामीण भागातील गरीब लोकांसाठी पंतप्रधान आवास योजना राबविली जात आहे. परंतु सोडतीच्या २० महिन्यानंतरही लोकांचे हक्काच्या घराचे स्वप्न अपूर्णच आहे.

हक्काच्या घराचे स्वप्न अपूर्णच! प्रधानमंत्री आवास योजना
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशातील प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे. यासाठी केंद्र सरकारतर्फेशहरी व ग्रामीण भागातील गरीब लोकांसाठी पंतप्रधान आवास योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत नागपूर शहरात ४ हजार ३४५ घरांचे निर्माण मागील काही वर्षापूर्वी हाती घेण्यात आले. लोकसभा निवडणुकीपूर्वी या घरांची लॉटरी काढण्यात आली. सोडतीत नंबर लागलेल्यांना काही दिवसातच घरकुलांचे वाटप करण्यात येईल. अशी घोषणा करण्यात आली होती. परंतु सोडतीच्या २० महिन्यानंतरही लोकांचे हक्काच्या घराचे स्वप्न अपूर्णच आहे.
नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधीकरण (एनएमआरडीए) व नासुप्रच्यावतीने पंतप्रधान आवास योजना राबविली जात आहे. यासाठी दोन वर्षापूर्वी आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. सुरुवातीला १०हजाराहून अधिक अर्ज आल्याने १८ आॅगस्ट २०१९ रोजी ड्रा पध्दतीने सोडत काढण्यात आली. सोडतीत नबर लागलेल्यांनी कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर काही महिन्यातच घरकुलाचे वाटप करण्यात येईल, अशी घोषणा एनएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी केली होती. मात्र या प्रकल्पात अनेक अडचणी आल्याने प्रकल्पाचे काम तसेच वाटपाची र्प्रक्रीया रखडली. प्रकल्पाच्या ठिकाणी वीज, पाणी, रस्ते, पावसाळी नाल्या, गडर लाईन यासह सर्व प्रकारच्या जीवनावश्यक सुविधा उपलब्ध असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. असे असूनही अपेक्षित प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे.
घराची किंमत परवडण्याजोगी नाही
प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून ४ ते ५ लाखांत घर मिळेल अशा आशेने हजारो लोकांनी घरासाठी अर्ज केले. यात प्रामुख्याने कामगार वर्गाचा समावेश होता. मात्र शासनाच्या २.६५ हजारांच्या अनुदाना व्यतिरिरक्त लाभार्थीला ९ ते १० लाख भरावयाचे आहे. ही रक्कम त्यांना भरणे शक्य नसल्याने अनेकांनी सोडतीत नंबर लागल्यानंतरही घरकुलासाठी प्रयत्न प्रयत्न केले नाही.
उभारलेली घरे कामगारांच्या गैरसोयीची
प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून उभारण्यात आलेली घरे शहरालगच्या भागात आहेत. त्यामुळे कामाच्या ठिकाणापासून हे अंतर लांब असल्याने घर मिळाले तरी येथून कामावर जाणे गैरसोयीचे असल्याने कामगारांचा या योजनेला अपेक्षित प्रतिसाद नाही.
३२०० हजार घरांचे काम अंतिम टप्प्यात
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधण्यात येत असलेल्या एका घरकुलाचे क्षेत्र सुमारे ३२० चौरस फूट आहे. नागपुरात मौजा वाठोडा, तरोडी (खुर्द) मौजा वांजरी, वाठोडा या भागात स्वस्त घरे बांधण्यात येत आहेत. सुमारे ३ हजार २०० घरांचे काम अंतिम टप्प्यात आहे. परंतु विविध अडचणीमुळे काम रखडले आहे. पावसाळा जवळ आला आहे. अशा परिस्थितीत दिवाळीपूर्वी काम पूर्ण होण्याची शक्यता नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.