गँगरेपमध्ये नाट्यमय घडामोड
By Admin | Updated: December 24, 2014 00:39 IST2014-12-24T00:39:25+5:302014-12-24T00:39:25+5:30
नाट्यमय घडामोडींमुळे सुरुवातीपासूनच पोलिसांना हादरा देणाऱ्या कळमन्यातील सामूहिक बलात्काराच्या (गँगरेप) घटनेत पुन्हा एक नाट्यमय घडामोड पुढे आली आहे. सामूहिक बलात्काराची शिकार

गँगरेपमध्ये नाट्यमय घडामोड
सहा जणांनी केला बलात्कार : एफआयआरमध्ये पाचचीच नोंद
नागपूर : नाट्यमय घडामोडींमुळे सुरुवातीपासूनच पोलिसांना हादरा देणाऱ्या कळमन्यातील सामूहिक बलात्काराच्या (गँगरेप) घटनेत पुन्हा एक नाट्यमय घडामोड पुढे आली आहे. सामूहिक बलात्काराची शिकार ठरलेल्या तरुणीने तक्रारीत दिलेल्या आरोपींच्या संख्येपेक्षा या गुन्ह्यात एक आरोपी जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा पोलीस ‘कन्फ्यूूज’ झाले होते. सहावा आरोपी करावा की नको, अशी पोलिसांची संभ्रमावस्था होती. शेवटी बराच विचारविमर्श केल्यानंतर या प्रकरणात सहावा आरोपी रोशन ऊर्फ भाजी मधुकर इंगळे (सद्भावनानगर, नंदनवन) याला अटक करण्याचा पोलिसांनी निर्णय घेतला.
१ डिसेंबरच्या रात्री पोलीस असल्याची बतावणी करून पाच आरोपींनी आपल्या मैत्रिणीचे अपहरण केल्याची माहिती पीडित तरुणीच्या मित्राने पोलिसांना दिली. त्यामुळे हादरलेल्या पोलिसांची शोधाशोध सुरू असताना रात्री ९.४५ वाजता पीडित तरुणीने घरी पोहोचल्याचे मित्राला फोनवरून सांगितले. पोलिसांनी तिचे घर गाठून चौकशी केली असता तिने ‘पाच जणांनी चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार केल्याचे सांगितले.’ त्यामुळे पोलिसांना दुसरा हादरा बसला. आरोपी कोण आहेत किंवा ही घटना कुठे घडली, ते तरुणीला सांगता येत नव्हते. ‘ते दोन दुचाकींवर होते’, एवढेच ती सांगत होती. त्यामुळे पोलिसांवरील दडपण जास्तच वाढले. तब्बल १५ दिवसानंतर पोलिसांना घटनास्थळ आणि आता २२ दिवसानंतर आरोपी सापडले. मात्र, पोलिसांना आता पुन्हा एक धक्का बसला आहे. तो म्हणजे, ‘बलात्कार करणारे पाच नव्हे तर सहा आरोपी होते. या गुन्ह्यात दोन नव्हे तर तीन दुचाकींचा वापर केला’, अशीही माहितीवजा कबुली देऊन आरोपींनी पोलिसांना धक्का दिला आहे. पीडितेची तक्रार, एफआयआरमध्ये पाच आरोपी आणि त्यांच्या दोन दुचाकी, अशी नोंद आहे. त्यामुळे आता सहावा आरोपी करावा की नको, पुढे या बाबीचा आरोपींना फायदा होणार का, कोर्टात या मुद्यावरून बचाव पक्षाचे वकील पोलिसांची गोची करणार काय, असे अनेक प्रश्न वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पडले. शेवटी जेवढे आरोपी आहेत, तेवढ्यांनाही अटक करा, असे निर्देश वरिष्ठांकडून मिळाल्यामुळे सहावा आरोपी रोशन ऊर्फ भाजी मधुकर इंगळे (सद्भावनानगर, नंदनवन) याला पोलिसांनी आज अटक केली. (प्रतिनिधी)
डीएनएतून मिळेल पुरावा
अत्याचाराचा जबर मानसिक धक्का बसल्यामुळे पीडित तरुणीला व्यवस्थित माहिती देता आली नाही. मात्र, तिची आणि आरोपीची डीएनए टेस्ट करून या प्रकरणातील वास्तव उघड करता येईल. कोर्टात गोची होणार नसल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सांगत आहेत.
सोमवार ते सोमवार
१ डिसेंबरच्या रात्री घडली, तो दिवस सोमवार होता. ती प्रचंड हादरली होती. त्यामुळे तिला कुठे घटना घडली तेसुद्धा नीट सांगता येत नव्हते. तब्बल १५ दिवसानंतर (१५ डिसेंबर) पोलिसांना घटनास्थळ सापडले, तो दिवसही सोमवार होता. आता पोलिसांनी आरोपींना ज्या दिवशी अटक केली तो दिवसही सोमवारच आहे.