मातृशक्तीच्या सन्मानाचा संदेश देणारे नाट्य ‘ओनामा’
By Admin | Updated: November 18, 2014 00:54 IST2014-11-18T00:54:01+5:302014-11-18T00:54:01+5:30
भाजप सांस्कृतिक आघाडी आणि संजय भाकरे फाऊंडेशनच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या नाट्य उपक्रमाने रसिकांच्या मनात कौतुकाचे स्थान आता निर्माण केले आहे. प्रेक्षकांच्या विचारांना चालना

मातृशक्तीच्या सन्मानाचा संदेश देणारे नाट्य ‘ओनामा’
भाजप सांस्कृतिक आघाडी : नवोदितांचे दमदार सादरीकरण
नागपूर : भाजप सांस्कृतिक आघाडी आणि संजय भाकरे फाऊंडेशनच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या नाट्य उपक्रमाने रसिकांच्या मनात कौतुकाचे स्थान आता निर्माण केले आहे. प्रेक्षकांच्या विचारांना चालना देणाऱ्या आणि त्यांना अंतर्मुख करणाऱ्या तसेच पारंपरिक अंधश्रद्धांवर प्रहार करणाऱ्या नाटकांच्या सादरीकरणाने प्रेक्षक या उपक्रमात समृद्ध होत आहेत. नाट्य संहितांना सकस व दर्जेदार पद्धतीने दर महिन्यात सादर करण्यात येत असलेल्या या उपक्रमात या महिन्यात ‘ओनामा’ हे नाट्य सादर करण्यात आले. या नाटकाने रसिकांना अंतर्मुख केले. याप्रसंगी रमेश अंभईकर आणि प्रतिभा कुळकर्णी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
हे नाटक साईकृपा मंगल कार्यालयात सादर करण्यात आले. ओंकारनामा या शब्दातून तयार झालेल्या शीर्षकाचा अर्थ आहे शुभारंभ. जीवनाची सुरुवात कुठल्या उद्देशाने करावी, मनाचिये गुंती कुठल्या प्रार्थनेचा शेला पांघरावा, अशा भावनेचे हे नाट्य होते. या नाटकाची निर्मिती संजय भाकरे आणि कुणाल गडेकर यांनी केली होती. दिग्दर्शन गजानन पांडे यांचे होते. या प्रयोगाचे उद्घाटन प्रा. राजीव हडप यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्रीकांत देशपांडे, सत्कारमूर्ती ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश अंभईकर, ज्येष्ठ साहित्यिका प्रतिभाताई कुळकर्णी प्रामुख्याने उपस्थित होते. विमुक्त जीवनशैलीच्या आरण्य संस्कृतीतून उत्क्रांत होत गेलेल्या मानवी जीवनातील भल्या-बुऱ्या अनुभवांच्या विविध रंगछटांचे हे भावचित्रण कलावंतांनी सहज अभिनयाने सादर केले. ज्ञानाच्या, प्रगतीच्या आणि अत्याधुनिक जीवनाच्या लालसेने ज्ञानार्जनाचा ओनामा उमलत्या पिढीच्या वास्तविक अनुभवातून समोर जातो. समाजातून हरविणारी मूल्ये, विद्यापीठातला भ्रष्टाचार, भ्रष्ट राजकारणी आणि व्यसनाधीन झालेली तरुणाई अशा विविध अनुभूतींच्या विषयावर हे नाट्य विचारप्रवृत्त करणारे ठरले. मातृशक्तीचा अवमान करणाऱ्या पुरुषाला एकात्मतेची महती सांगण्यात हे नाट्य यशस्वी ठरले. रमेश कोटस्थाने यांचे लेखन होते. सूत्रधार नितीन पात्रीकर, संगीत केयुर भाकरे, नेपथ्य सुवर्णा बोरकर, प्रकाशयोजना मकरंद भालेराव, अमित अंबुलकर, रंगमंच व्यवस्था प्रथमेश देशपांडे यांची होती. यात अभय देशमुख, अबोली केळकर, मधुरा माने, राहुल गणोरकर, गौरी सोनटक्के, स्वाती गुप्ती, अश्विनी गेडाम, श्रेया फडणवीस, शरयु मते, कुणाल गोरले, विशाल बर्वे, योगेश धांडे व पवन थेर यांनी भूमिका केल्या. (प्रतिनिधी)