रस्ता रुंदीकरणात सांडपाण्याची नाली तुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:19 IST2021-01-13T04:19:09+5:302021-01-13T04:19:09+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : कळमेश्वर-ताेंडाखैरी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून, या कामात गाेवरी येथील सांडपाणी वाहून जाणारी नालीची ...

रस्ता रुंदीकरणात सांडपाण्याची नाली तुटली
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : कळमेश्वर-ताेंडाखैरी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून, या कामात गाेवरी येथील सांडपाणी वाहून जाणारी नालीची पूर्णत: ताेडफाेड झाली आहे. यामुळे गावकऱ्यांना सांडपाणी मिश्रित दूषित पाणी मिळत असल्याने नागरिकांच्या आराेग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.
खैरी (लखमा) ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या गाेवरी गावात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी गावातील डांबरी रस्त्यालगत पाईपलाईन व सांडपाणी वाहून नेण्यासाठी सिमेंट पाईप टाकण्यात आल्या होत्या. मागील अनेक दिवसांपासून या मार्गाचे रुंदीकरण सुरू आहे. या कामासाठी संबंधित कंत्राटदाराने गावातून गेलेल्या मार्गाच्या दुतर्फा खोदकाम केले आहे. यात सांडपाणी वाहून नेणाऱ्या सिमेंट पाईप तसेच पाणीपुरवठ्याची पाईपलाईन फोडल्याने गावात सांडपाणी मिश्रित पाणीपुरवठा हाेत आहे. शिवाय, सांडपाणी वाहून जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने दिवसभर रस्त्यावर सांडपाणी वाहते. यामुळे परिसरात दुर्गंधी सुटत असून, दूषित पाणी पिल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराकडून पाईपलाईन व नालीचे बांधकाम करून द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
....
या समस्येबाबत संबंधित कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांशी चर्चा केली असून, पाईपलाईनची दुरुस्ती व सांडपाण्याच्या नालीचे बांधकाम करून देण्याचे त्यांनी मान्य केले आहे.
- सचिन निंबाळकर, सरपंच, ग्रामपंचायत खैरी (लखमा)