डाॅ. एस. व्यंकट माेहन नीरीचे नवे संचालक; गुरुवारी सांभाळला पदभार
By निशांत वानखेडे | Updated: January 30, 2025 18:54 IST2025-01-30T18:54:11+5:302025-01-30T18:54:44+5:30
Nagpur : राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्थेचे नवे संचालक नियुक्ती

Dr. S. Venkat Mohan Neeri's new director
नागपूर : राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (सीएसआयआर-नीरी) चे नवे संचालक म्हणून डाॅ. एस. व्यंकट माेहन यांची नियुक्ती झाली आहे. गुरुवारी त्यांनी आपला पदभार स्वीकारला. माजी संचालक डाॅ. अतुल वैद्य यांची लिटूचे कुलगुरू म्हणून नियुक्ती झाल्यानंतर डाॅ. सी. आनंदरामकृष्णन यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आला हाेता. आता डाॅ. व्यंकट माेहन यांच्या रुपाने नीरीला पूर्णवेळ संचालक मिळाले आहेत.
डाॅ. व्यंकट माेहन हे भारतीय रासायनिक प्राैद्याेगिकी संस्था (सीएसआयआर-आयआयसीटी), हैदराबाद येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून सेवारत हाेते व पर्यावरण अभियांत्रिकी आणि शाश्वतता या क्षेत्रात महत्त्वाचे याेगदान दिले आहे. डाॅ. माेहन यांनी स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये बी.टेक. आणि पर्यावरण अभियांत्रिकीमध्ये एम.टेक. व पीएचडी केली आहे. ते जापानच्या क्याेटाे आणि जर्मनीच्या म्युनिख येथील टेक्नीकल विद्यापीठाचे फेलाे आहेत. बायोएनर्जी, डीकार्बोनाइजेशन, मायक्रोबियल इलेक्ट्रोकेमिकल सिस्टम, बायोरिफाइनरीज व वेस्ट व्हेलोराइज़ेशन यावर संशाेधन केले असून ते सस्टेनेबिलिटी व सर्क्युलर बायोएकोनॉमीवर केंद्रित आहे, जे पायलट स्तरावर विविध प्रकल्पात कार्यान्वित आहे.
डॉ. मोहन यांनी ४५० हून अधिक शाेधप्रबंध केले असून पाच पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या नावे १६ पेटेंट व ३६ हजार सायटेशन प्राप्त आहेत. त्यांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. स्टॅनफाेर्ड विद्यापीठातर्फे जगातील सर्वाेत्कृष्ठ २ टक्के संशाेधकांमध्ये डाॅ. माेहन यांचा समावेश केला हाेता.