डॉ. प्रवीण गंटावार दोन प्रकरणात आरोपी : गुन्हे शाखेच्या चौकशीचा निष्कर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 22:55 IST2020-11-09T22:51:28+5:302020-11-09T22:55:23+5:30
Dr. Praveen Gantawar case महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार यांना ॲलेक्सिस हॉस्पिटल तसेच कथित हनी ट्रॅप प्रकरणात गुन्हे शाखेने आरोपी बनविले आहे. या घडामोडीमुळे महापालिका वर्तुळ अस्वस्थ झाले आहे.

डॉ. प्रवीण गंटावार दोन प्रकरणात आरोपी : गुन्हे शाखेच्या चौकशीचा निष्कर्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार यांना ॲलेक्सिस हॉस्पिटल तसेच कथित हनी ट्रॅप प्रकरणात गुन्हे शाखेने आरोपी बनविले आहे. या घडामोडीमुळे महापालिका वर्तुळ अस्वस्थ झाले आहे.
कोराडी मार्गावरील ॲलेक्सिस हॉस्पिटलमध्ये ४ जुलैला कुख्यात साहिल सय्यद आणि त्याच्या साथीदारांनी हैदोस घालून तोडफोड केली होती. तत्पूर्वी आणि त्यानंतरही साहिल टोळीने हॉॅस्पिटल प्रशासनाला ब्लॅकमेल करणे सुरूच ठेवले होते. डॉ. गंटावारच्या इशाऱ्यावरूनच हा गोंधळ घातला जात असल्याचे बोलले जात होते. ही चर्चा सुरूच असतानाच साहिल सय्यदची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली. त्यात महापौर संदीप जोशी आणि नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याबाबतचे संभाषण होते. लोकमतने हे प्रकरण लावून धरले होते. त्याची तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी गंभीर दखल घेतली होती. गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला होता. या प्रकरणाच्या प्रदीर्घ चौकशीत दोन्ही प्रकरणात डॉ. गंटावारचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गंटावारला या दोन्ही प्रकरणात आरोपी बनविण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांनी दिली. दरम्यान, ही माहिती कर्णोपकर्णी चर्चेला आल्याने महापालिका वर्तुळात तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.
महापालिकेकडूनही कारवाई?
एकसाथ दोन गुन्ह्यात सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असल्याने डॉ. गंटावारविरुद्ध महापालिका प्रशासनाकडूनही कारवाई होण्याची शक्यता बळावली आहे.