Dr. Police appeal to celebrate Babasaheb's birth anniversary at home | डॉ. बाबासाहेबांची जयंती घरीच साजरी करण्याचे नागपूर पोलिसांचे आवाहन

डॉ. बाबासाहेबांची जयंती घरीच साजरी करण्याचे नागपूर पोलिसांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशासह नागपुरातील कोरोनाचा प्रकोप टाळण्यासाठी देशहिताच्या दृष्टीने यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरातच साजरी करा, आणि देशहितासाठी गर्दी टाळा, असे आवाहन गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त निलेश भरणे यांनी केले.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनीयर्स (बानाई), असोसिएशन फॉर सोशल अ‍ॅन्ड इकॉनॉमिक ईक्वलिटी, समता सैनिक दल, आवाज इंडिया टी.व्ही., महाराष्ट्र ऑफीसर्स फोरम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती तसेच शांतीवन, विचोली येथील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी झाली. यात हे आवाहन केले.
दरवर्षी १४ एप्रिलला प्रामुख्याने दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, नागलोक, निलोली, बुद्धवन तसेत शहरातील बौद्ध विहारांच्या ठिकाणी मिरवणुकीसह कार्यक्रम व उपक्रम होतात. यंदा असे कार्यक्रम न घेता महामानवास घरुनच अभिवादन करावे व पुष्पहार अर्पण करावा. कोरोनाबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमास परवानगी नाही
सध्या राज्यात कलम १४४ लागू असून पोलीस विभागाकडून १३ व १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कोणत्याही कार्यक्रमास परवानगी दिली जाणार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई होणार असल्याने बौद्ध बांधवांनी पोलिसांना सहकार्य करावे. यासाठी भंतेजींनी स्थानिक पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मदतीने परिसरातील बांधवांना मार्गदर्शन करावे, असे सांगण्यात आले.

दीक्षाभूमी परिसर करणार सील
१३ व १४ एप्रिल रोजी दीक्षाभूमी व सभोवतालचा परिसर बंद ठेवला जाणार आहे. दीक्षाभूमी स्मारक समितीने ही जबाबदारी घेतली आहे. दीक्षाभूमीभवताच्या माता कचेरी चौक, लक्ष्मीनगर चौक, काचीपुरा चौक व बजाजनगर या चारही चौकात पोलीस बंदोबस्त लावून परिसर सील करण्यात येणार आहे. दीक्षाभूमीचे मागील प्रवेशद्वारही बंद ठेवले जाणार आहे.

पदाधिकाऱ्यांचेही आवाहन
दीक्षाभूमी स्मारक समितीसह सर्व संघटनांच्या पदाधिकाºयांनीही यंदा घरातून महामानवाला अभिवादन करावे व आदरांजली वाहावी, असे आवाहन केले आहे. कोरोनासाठी प्रशासनाने घेतलेली दक्षता सर्व समाजहिताची असल्याने नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे तसेच, चित्रकला, भिमगीत, निबंध असे उपक्रम राबवून आवाज इंडियाकडे पाठविण्याचेही यावेळी सांगण्यात आले.

 

Web Title: Dr. Police appeal to celebrate Babasaheb's birth anniversary at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.