डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कैद्यांसाठी आनंदवार्ता
By Admin | Updated: June 4, 2017 17:41 IST2017-06-04T17:41:09+5:302017-06-04T17:41:09+5:30
राज्यातील विविध कारागृहांतील कैद्यांना राज्यमाफी (शिक्षेतून सूट) देण्याचा निर्णय गृह विभागाने शनिवारी जाहीर केला.

डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कैद्यांसाठी आनंदवार्ता
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : विविध गुन्ह्यांमध्ये इमानेइतबारे शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना राज्य शासनाने खुशखबर दिली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त (समता वर्ष) राज्यातील विविध कारागृहांतील कैद्यांना राज्यमाफी (शिक्षेतून सूट) देण्याचा निर्णय गृह विभागाने शनिवारी जाहीर केला.
राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त शासन चालू वर्ष ‘समता वर्ष’ म्हणून साजरे करीत आहे. यानिमित्त घटनेतील तरतूदीनुसार, कैद्यांना राज्यमाफी मिळावी, अशी मागणी वऱ्हाड (व्हॉल्यूंटरी अॅक्शन फॉर रिहॅबिलिटेशन अँड डेव्हलपमेंट) संस्थेने शासनाकडे केली होती. बरेच बंदी निर्दोष असूनही शिक्षा भोगत असतात. तर कित्येकांकडून परिस्थितीमुळे अपराध घडतो. अशा लोकांना झालेल्या शिक्षेमुळे तो व्यक्ती व त्याच्या कुटुंबाचेही नुकसान होते. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीकोनातून कैद्यांना शिक्षेत सूट देण्याची मागणी वऱ्हाड संस्थेने २० फेब्रुवारी २०१६ रोजी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानंतर गेले वर्षभर या संस्थेने मागणीबाबत विविध स्तरावर सतत पाठपुरावा केला. अखेर या पाठपुराव्याला यश आले असून, गृहविभागाने कैद्यांसाठी राज्यमाफीचा आदेश शनिवारी जारी केला.
यापूर्वी स्वातंत्र्याच्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त १९९७ मध्ये राज्य शासनाने अशी राज्यमाफी दिली होती. त्यानंतर जवळपास २० वर्षानंतर पुन्हा राज्यशासनाने कैद्यांना आनंदवार्ता दिली आहे. महाराष्ट्रातील ९ मध्यवर्ती कारागृह, ३१ जिल्हा कारागृह, १३ खुले कारागृह आणि एका खुल्या वसाहतीतील बंद्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. हा आदेश १४ एप्रिल २०१६ पासून अमलात येणार आहे. त्यामुळे या दिवशी जामीनावर असलेल्या, पॅरोल, फर्लो रजेवर असलेल्या बंद्यांना राज्यमाफीचा लाभ मिळेल. मात्र कारागृहातून फरार असलेल्या बंद्यांना ही सुट मिळणार नाही. तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम १२१ ते १३० अंतर्गत (राज्यविरोधी कारवाईचे गुन्हे) शिक्षा भोगत असलेले बंदी, न्यायाधीन बंदी, केंद्रीय कायद्यांर्गत शिक्षा भोगत असलेले बंदी, दिवाणी कायद्यांतर्गत शिक्षा भोगत असलेले बंदी किशोर सुधारालयातील बंदी या सवलतीसाठी पात्र नाहीत.
वऱ्हाड संस्था कारागृहातील बंद्यांमध्ये सुधारणा आणि पुनर्वसनाबाबत विदर्भातील विविध कारागृहांमध्ये काम करते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त बंद्यांना राज्यमाफी मिळण्याबाबत संस्थेने सतत पाठपुरावा केला.
- रवींद्र वैद्य,
संस्थापक अध्यक्ष, वऱ्हाड संस्था
अशी मिळणार शिक्षेत सूट
३ महिन्यांपर्यंत ७ दिवस
३ महिन्यांपेक्षा अधिक ते १ वर्षापर्यंत १५ दिवस
१ वर्षापेक्षा अधिक ते ५ वर्षांपर्यंत २ महिने
५ वर्षांपेक्षा अधिक किंवा जन्मठेप ३ महिने