डॉ. आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकाला मिळणार गती

By Admin | Updated: December 21, 2014 00:16 IST2014-12-21T00:16:14+5:302014-12-21T00:16:14+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर व विदर्भातील रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याची धडक मोहीम सुरू केली आहे. यातच शुक्रवारी त्यांनी घेतलेल्या नागपुरातील रस्त्यांच्या आढावा बैठकीत

Dr. Ambedkar's birth centenary commemorates the momentum | डॉ. आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकाला मिळणार गती

डॉ. आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकाला मिळणार गती

लीज नुतनीकरणाचा अडथळा दूर होणार
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर व विदर्भातील रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याची धडक मोहीम सुरू केली आहे. यातच शुक्रवारी त्यांनी घेतलेल्या नागपुरातील रस्त्यांच्या आढावा बैठकीत पटवर्धन मैदानावरील जागेच्या लीज नूतनीकरण संबंधातील प्रस्ताव तातडीने पाठविण्यात यावा, अशा सूचना दिल्या. धंतोली येथील पटवर्धन मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक प्रस्तावित आहे. परंतु जागा लीज नूतनीकरणामुळे या स्मारकाचे काम रखडले होते. मुख्यमंत्र्यांनी याबाबत पुढाकार घेतल्याने आता स्मारकाच्या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत लोकमतने वारंवार वृत्त प्रकाशित करीत प्रशासन व शासनाचे लक्ष वेधले होते, हे विशेष.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त १९९२ साली महापालिकेने स्वत:हून शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. महापालिका सभागृहात त्याला एकमुखाने मंजुरीसुद्धा प्रदान केली होती. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी भव्य असे स्मारक होणार होते. मनपाने त्यासाठी एक समिती स्थापन केली होती. त्या समितीने पटवर्धन मैदानाची जागा स्मारकासाठी निश्चित केली. एक कोटी रुपयांची तरतूदसुद्धा महापालिकेने केली होती. परंतु त्यानंतर त्यावर काहीच काम झाले नाही. तब्बल दहा वर्ष ती फाईल धूळखात पडली होती. अधूनमधून काही आंबेडकरी संघटनांकडून स्मारकाचा मुद्दा रेटला जात होता. मात्र त्यात फारसा जोर नसल्याने मनपा प्रशासनानेही त्याकडे कधी लक्ष दिले नाही.
२००२ साली महापालिकेच्या पहिल्याच सभेत नव्यानेच निवडून आलेल्या बहुजन समाज पार्टीच्या सदस्यांनी जन्मशताब्दी स्मारकाचा मुद्दा उपस्थित केला. मनपाचे पक्षनेते असलेले राहुल तेलंग यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेत कामकाज बंद पाडले. तेव्हा महापौर विकास ठाकरे आणि मनपा आयुक्त टी. चंद्रशेखर होते. फाईल शोधण्यात आली. तीन तासानंतर स्मारकावर चर्चा झाली. पुन्हा एक समिती स्थापन झाली. टी. चंद्रशेखर यांनी यासंदर्भात पुढाकार घेतला. स्मारकाबाबतचे डिझाईन तयार करून घेण्यात आले. दरम्यान पटवर्धन मैदानावरील लीज संपली. त्याचे नूतनीकरण करण्यासंदर्भात महापालिकेने सरकारकडे अर्ज केला. त्यासंबंधी आवश्यक रक्कमही भरली. परंतु कुठे माशी शिंकली माहीत नाही. लीज नूतनीकरणाचे भिजतघोंगडे कायम होते.
यानंतर आंबेडकरी संघटनांमध्ये सुद्धा नाराजी पसरली. रिपब्लिकन मुव्हमेंट, रिपब्लिकन पँथर, समता सैनिक दल, रिपाइं, रिपब्लिकन आघाडी, पीपल्स डेमोक्रेटिक मुव्हमेंट आदींसह विविध आंबेडकरी संघटनांनी वारंवार आंदोलने केली. आजही या विषयावर आंदोलने सुरूआहेत. दरवर्षी हिवाळी अधिवेशनात यावर आवाज उठवला जातो. तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी चिटणीस पार्क मैदानावर झालेल्या जाहीर सभेत सात दिवसांच्या आत हा प्रश्न निकाली लावण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यानंतरही काहीच झाले नाही. प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी केवळ आश्वासनच दिले मात्र कारवाई झाली नाही. दरम्यान आंबेडकरी संघटनांच्यावतीने सातत्याने आंदोलने सुरू आहेत. परंतु त्याला फारसे यश आलेले नाही. पण मुख्यमंत्री आपल्या नागपूरचेच असल्याने आणि त्यांनी यासंदर्भात पुढाकार घेतला असल्याने या स्मारकाच्या कामाला गती मिळण्याची शक्यता बळावली आहे. (प्रतिनिधी)
असे राहील स्मारक
तत्कालीन मनपा आयुक्त टी. चंद्रशेखर यांनी तयार केलेल्या स्मारकाच्या डिझाईननुसार तीन हजार लोक बसू शकतील, असे भव्य वातानुकूलित भव्य सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह सर्व महापुरुषांची ग्रंथसंपदा, त्यांच्यावरील संदर्भ ग्रंथ असलेले विशाल ग्रंथालय आणि विविध विषयांवर संशोधन करणाऱ्या विद्यार्थी संशोधकांसाठी स्वतंत्र असे संशोधनालय आदींची व्यवस्था करण्याचे नियोजित होते. स्मारकाच्या या संपूर्ण प्रकल्पावर एकूण २५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता.

Web Title: Dr. Ambedkar's birth centenary commemorates the momentum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.