लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आता कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिस आता अधिक कडक कारवाई करणार आहेत. अनेकदा वाहतूक नियम तोडल्यावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर त्यांचे करिअर लक्षात घेता गुन्हा दाखल न करत दंड ठोठावून सोडण्यात येत होते. मात्र, आता करिअरचा विचार न करता नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिले आहेत. ते गुरुवारी पत्रपरिषदेदरम्यान बोलत होते.
यावेळी सहपोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, वाहतूक पोलिस उपायुक्त लोहित मतानी उपस्थित होते. पोलिसांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत आणखी ठोस पावले उचलण्याचे ठरविले आहे. रॅश ड्रायव्हिंग, चुकीच्या बाजूने गाडी चालवणे आणि अल्पवयीन मुलांना रस्त्यावर दुचाकी चालवण्यास परवानगी देणे यासाठी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. तसेच वाहने जप्त करण्यात येतील, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले.
तसेच राँग साइड वाहने चालविणे, दुचाकीवर ट्रीपल सीट प्रवास, भरधाव वाहन चालवणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन कोणत्याही परिस्थितीत सहन होणार नाही. खासगी ट्रॅव्हल्स बसचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असतील तर पोलिसांनी कारवाई करताना कोणालाही घाबरण्याची अथवा दबावात येण्याची गरज नाही. वाहतूक नियमांचा भंग करून कायदा हाती घेणाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही.
अल्पवयीन मुले जर वाहतूक नियम मोडून ट्रिपल सीट, विरुद्ध दिशेने वाहन चालवताना आढळली तर पालकांवर गुन्हे दाखल करण्याची तरतूद नव्या वाहतूक कायद्यात आहे. यापुढे शहरात वाहतूक नियम मोडण्याची कोणी हिंमत करणार नाही, अशी कायदेशीर कारवाई करण्याचे संपूर्ण अधिकार प्रत्यक्ष रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना असतील. कारचे चालक सीटबेल्टशिवाय अथवा मोबाइलवर बोलत वाहन चालवताना आढळली तर त्यांच्यावरही नव्या भारतीय दंडसंहितेनुसार कारवाई केली जाईल, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.
पोलिसांना बॉडी वॉर्न कॅमेरे वापरण्याचे निर्देशकारवाईदरम्यान नागरिक अनेकदा वाहतूक पोलिसांशी वाद घालतात, या कारणास्तव वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना कर्तव्यादरम्यान बॉडी वॉर्न कॅमेरे वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना नागरिकांची सौजन्याने वागण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.